आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्षणे वाढली:चिंता; पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये नेत्ररोगाची लक्षणे वाढली

गणेश सूर्यवंशी | धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेरोना काळात ऑनलाइन अभ्यासाची सवय जडल्यामुळे विद्यार्थ्यांना नेत्ररोग होण्याचा धोका वाढला आहे. आता शाळा, महाविद्यालये नियमित सुरू झाले असले तरी मुले सतत संगणक, मोबाइल, टीव्हीचा वापर करत असल्याने हा धोका वाढल्याची धक्कादायक बाब शहरातील नेत्ररोगतज्ञ डॉ. मुकर्रम खान यांनी केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. त्यांनी शहरी व ग्रामीण भागातील ६०० मुलांचे सर्वेक्षण केले. त्यात शहरातील ३०० विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यातून सुमारे ७५ टक्के मुलांना नेत्ररोग होण्याचा धोका आढळला. त्यातही पहिली ते दहावीच्या मुलांमध्ये प्रमाण जास्त आहे.

मोबाइलची रेंज नसलेल्या भागात पाहणी
डॉ. मुकर्रम खान यांनी ग्रामीण, अतिदुर्गम भागातील ३०० व शहरातील ३०० अशा एकूण ६०० मुलांच्या नेत्ररोगाचे सर्वेक्षण केले. त्यात पहिली ते दहावीच्या मुलांमध्ये नेत्ररोगाची लक्षणे जास्त आढळली. डॉ. खान यांनी अद्याप वीज न पोहाेचलेल्या व माेबाइलची रेंज नसलेल्या दुर्गम, डोंगराळ भागातील मुलांचाही अभ्यास केला. ‘अ स्टडी ऑफ डिजिटल इलेक्ट्राॅनिक्स डिव्हाइसेस ऑन आय हेल्थ इन स्कूल चिल्ड्रेन’ हा त्यांचा अभ्यासाचा विषय होता. या सर्वेक्षणाला सुमारे ८ महिन्यांचा कालावधी लागला.

रेटिनाचा आकार कमी : शहरी भागात दृष्टिदोष निर्माण झालेल्या मुलांच्या डोळ्यातील रेटिनाचा आकार कमी झाला आहे. तसेच मुलांच्या डोळ्यातून सतत पाणी येते. ग्रामीण मुलांमध्ये नेत्ररोगाचे प्रमाण केवळ ११ टक्के आहे.

आनुवंशिक नेत्ररोगाचे प्रमाण ५ टक्के
मुलांमध्ये आनुवंशिक नेत्ररोगाचे प्रमाण शहर व ग्रामीण भागात प्रत्येकी ५ टक्के आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच्या सर्वेक्षणातही हे प्रमाण ५ टक्केच होते.

९ टक्के मुलांमध्ये सदोष दृष्टिदोष
९ टक्के मुलांनी मोबाइल व इतर इलेक्ट्रानिक्स वस्तू गरजेपुरता वापरल्या. शिवाय लक्षणे आढळल्यावर सल्ला घेतला. त्यामुळे ९ टक्के मुलांचा दृष्टी सदोष असल्याचे डॉ. खान यांचे सर्वेक्षण सांगते.

मोबाइलचे व्यसन जडणे धोकेदायक
कोरोना काळात मुलांना मोबाइल व इतर इलेक्ट्राॅनिक्स वस्तू वापरण्याची सवय जडली. अभ्यासासाठी त्यांचा काही वेळ उपयोग योग्य होता. पण बहुतांश मुलांना त्याची सवय अर्थात व्यसन जडले आहे. त्यामुळे पालकांनीच लक्ष देणे गरजेचे आहे.-डॉ. मुकर्रम खान, नेत्रतज्ज्ञ, धुळे.

बातम्या आणखी आहेत...