आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका:अल्प चर्चेनंतर ‘स्थायी’त दहा विषय मंजूर; सभापती म्हणाले इथे नको दालनात बोलू

धुळे19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ३८ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सहा महिने मुदतवाढ, रस्त्याचा विषय कार्योत्तर मंजूर

महापालिका स्थायी समितीची सोमवारी सभा झाली. दहा विषय चर्चेसाठी होते. पण एखाद, दुसऱ्या विषयाचा अपवाद वगळता अन्य विषयांवर फारशी चर्चा न होता ३५ मिनिटांत सर्व विषय मंजूर करण्यात आले. सभेत नगरसेवकांनी विविध प्रश्न मांडल्यावर सभापती शीतल नवले यांनी त्यांना आपण दालनात बोलू असे म्हणत सभा आटोपती घेतली.

मनपा सभागृहात सभा झाली. सभापती शीतल नवले, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. विषयपत्रिकेवर दहा विषय होते. ते सर्व मंजूर झाले. मानधन तत्त्वावर कनिष्ठ अभियंता, स्त्रीरोगतज्ज्ञ, फिटर, लिपिक, टंकलेखक म्हणून कार्यरत असणाऱ्या ३८ जणांना ६ महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली. सर्वांना किमान वेतन आयोगाप्रमाणे मानधन द्यावे, अशी सूचना सभापती नवले यांनी केली. तसेच चुडामणी बंगला ते जयहिंद कॉलनीपर्यंत रस्ता डांबरीकरणाच्या कामाला कार्योत्तर मंजुरी देण्यावर चर्चा झाली.

नगरसेविका प्रतिभा चौधरी म्हणाल्या की, या रस्त्याचे काम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येणार असल्याने झाले. रस्त्याची रुंदी ९ मीटर असताना केवळ ५.५ मीटर डांबरीकरण झाले. त्यामुळे उर्वरित रस्त्याचे काम करावे, अशी मागणी त्यांनी केली. सभापती शीतल नवले म्हणाले की, हा रस्ता ५.५ मीटर रुंद आहे. अंदाजपत्रकातही ५.५ मीटरचाच उल्लेख असून रस्ता करताना खड्डे बुजवण्यात आल्याने दोन्ही बाजूने रस्ता रुंद दिसतो. तरीही रस्त्याच्या रुंदीकरण कामाचे अंदाजपत्रक करावे, अशी सूचना त्यांनी केली.

पाणीप्रश्नावर बोलतानाही नगरसेविकेला रोखले
सभेत पाणीप्रश्नावर बोलण्यासाठी नगरसेविका प्रतिभा चौधरी उभ्या राहिल्या. या वेळी सभापती शीतल नवले यांनी त्यांना थांबवले. तसेच दालनात अधिकाऱ्यांशी याविषयावर चर्चा करण्यात येईल असे सांगितले. तसेच नगरसेवक साबीर खान हे रस्त्याच्या प्रश्नावर बोलण्यासाठी उभे राहिले असता त्यांनाही दालनात अधिकाऱ्यांना बोलवून चर्चा करू असे सभापती नवले यांनी सांगितले. तसेच विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर झाल्याचे स्पष्ट केले.

वारंवार त्याच ठिकाणी जलवाहिनीला गळती
नगरसेविका किरण अहिरराव म्हणाल्या की, साक्री रस्त्याचे काम सुरू असताना दोन्ही बाजूला असलेल्या जलवाहिनीला गळती लागली आहे. काम केल्यानंतरही पुन्हा त्याच ठिकाणी गळती लागते आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यात अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे नवीन जलवाहिनी टाकण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

म्हणून नगरसेवक सभेत मांडतात त्यांच्या समस्या
सभेत विषय पत्रिकेवरील विषयावर फारसे कुणी बोलले नाही. दुसरीकडे सभापती शीतल नवले यांनी काही विषयांवर सभागृहाऐवजी त्यांच्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून चर्चा करण्याचे स्पष्ट केले. सभागृहात नगरसेवक प्रभागातील व शहरातील समस्या मांडतात. कारण याठिकाणी सर्व विभागाचे अधिकारी एकाच वेळी उपस्थित असतात. त्यांना नगरसेवकांना प्रश्न विचारता येतात. पण सोमवारच्या सभेत सभापतींचा कल दालनात चर्चा करण्याचा असल्याचे दिसले.

बातम्या आणखी आहेत...