आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी:केंद्रीय समिती येताच जिल्हा रुग्णालयाचा नूर पालटला; गैरहजर राहणारे वेळेत हजर

धुळे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची समीक्षा करण्यासाठी केंद्र सरकारच्या १४ प्रतिनिधींचे ‘सीआरएम’चे (काॅमन रिव्ह्यू मिशन) पथक शनिवारी जिल्ह्यात आले. त्यानंतर पथकाने रविवारी आढावा घेतला. जुन्या जिल्हा रुग्णालयातील विविध विभागांसह रुग्णवाहिकांची पाहणी केली. समितीच्या दौऱ्यामुळे जुन्या जिल्हा रुग्णालयाचा नूर पालटला असून कधीही न दिसणारे अधिकारी व कर्मचारी वेळेवर हजर होते.

केंद्र शासनाने देशभरात सन २००५ पासून राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) सुरू केले. त्यातून जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या उपक्रमांच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी ‘सीआरएम’चे पथक आले आहे. पथकात केंद्रातील अधिकारी असून त्यांनी रविवारी सन २०१९ ते २०२२ या तीन वर्षांत जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, मनपा क्षेत्र, हिरे वैद्यकीय महाविद्यालयात राबवण्यात आलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला. प्रत्येक योजनेचे किती उद्दिष्ट साध्य झाले याची माहिती घेतली. समितीच्या दौऱ्यामुळे ठिकठिकाणी स्वच्छता केली होती.

समिती आल्याने कर्मचाऱ्यांना भरली धडकी
समितीत १४ जण वेगवेगळ्या गटात आहे. समितीने जिल्हा रुग्णालयातील ओपीडी, आयपीडी, शस्त्रक्रिया विभागाची पाहणी करून शासनाच्या मानकानुसार सर्व बाबी आहे काय याची पडताळणी केली. १०८ रुग्णवाहिकांची पाहणी केली. रुग्णवाहिकेतील डॉक्टरांची उलट तपासणी घेतली. रजिष्टर तपासले. सिकलसेल कक्ष, क्षयरोग व कुष्ठरोग विभागाची पाहणी केली. एचआयव्ही एड‌्स निर्मूलन कार्यक्रमाची माहिती घेतली.

जिल्ह्यात ११ नोव्हेंबरपर्यंत असेल मुक्काम
समिती ११ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंमलबजावणीची स्थिती व ध्येय धोरण, आरोग्य यंत्रणांचे बळकटीकरण करण्यासाठी समस्यांचे विश्लेषण समिती करेल. नावीन्यपूर्ण उपक्रम, उत्कृष्ट कार्यपद्धतीची नोंदी घेतली जाईल. नवीन उपक्रम राबवण्यासाठी मूल्यमापन केले जाईल. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राला समिती भेट देईल.

बातम्या आणखी आहेत...