आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय, धुळे अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळेतील मुले-मुलीही आता स्मार्ट शिक्षण घेणार आहेत. त्याची सुरुवात साक्री तालुक्यातील उमरपाटा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेपासून झाली आहे. नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम धुळे प्रकल्पातील १० आश्रमशाळांमध्ये राबवण्यात येत आहे. सहायक प्रकल्प अधिकारी नवनाथ जानगर (प्रशासन) यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उमरपाटा शासकीय आश्रमशाळेत उद्घाटन करण्यात आले. यानिमित्त शाळा प्रवेशोत्सव व पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी नवीन विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवानिमित्त त्यांचे व पालकांचे प्रातिनिधिक स्वरूपात पुष्प देऊन स्वागत तर पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तसेच बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी धुळे जिल्हा परिषदेचे सदस्य छगन कृष्णा राऊत, साक्री पंचायत समितीच्या सदस्या रुथाताई सुनील बिलकुळे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक एस.एल. सोनवणे आदी उपस्थित होते.आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रकल्प कार्यालयातर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. आता विद्यार्थ्यांसाठी डिजिटल क्लास रूम तयार करण्यात आला आहे. त्यामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान मिळण्यास मदत होणार आहे. आश्रमशाळांबरोबरच आरोग्य सुविधा, दळणवळणाची साधने उपलब्ध करून दिली.
१० शाळांमध्ये डिजिटल क्लासरूमची उभारणी
धुळे प्रकल्पातील १० शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम कार्यान्वित केले आहेत. यात साक्री तालुक्यातील ७, शिरपूर तालुक्यातील २ तर शिंदखेडा तालुक्यातील एक आश्रमशाळेचा समावेश असल्याचेही जानकर यांनी सांगितले. राऊत यांनी सांगितले राज्य शासनाने शिक्षणासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी परिस्थितीची जाणीव ठेवत मनपूर्वक अभ्यास करावा, असे आवाहन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.