आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनुसार मनसे पदाधिकारी यांनी बुधवारी शहरात प्रार्थनास्थळासमोर भोंगा लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना चकवा देण्यासाठी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते दोन गटात विभागले होते. शहरात दोन तर पिंपळनेर वगळता इतरत्र आंदोलन झाले नाही. पोलिसांनी या प्रकरणी १४ संशयितांना ताब्यात घेतले होते. तर दुसरीकडे शहरातील अनेक प्रार्थना स्थळांनी देखील स्वत:हून भोंगे काढून घेतले.
प्रार्थनास्थळासमोर हनुमान चालिसा लावण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले होते. त्यासाठी ३ मे ची अल्टिमेटम देण्यात आले होते. तर बुधवारी मनसे पदाधिकारी भोंगा लावून हनुमान चालिसा पठण करणार होते. त्यासाठी भोंगा घेऊन मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. दुष्यंत राजे देशमुख व पदाधिकारी शिवतीर्थावरुन निघाले होते. या वेळी धुळे शहर पोलिसांच्या पथकाने जिल्हाध्यक्ष देशमुख, सरचिटणीस संदीप जडे, धुळे तालुकाध्यक्ष संतोष मिस्त्री, महिला जिल्हाध्यक्ष संध्या पाटील, उपजिल्हाध्यक्ष स्वाती जाधव, शहर उपाध्यक्ष, प्रशांत तनेजा, राजेश दुसाणे, विभाग अध्यक्ष योगेश वाणी, हरिष जगताप यांना प्रतिबंधात्मक अटक केली. तर आझाद नगर पेालिसांनी संजय सोनवणे, अॅड. प्रसाद देशमुख यांना आंदोलन करण्यापूर्वी ताब्यात घेतले. पिंपळनेर या ठिकाणी देखील आंदोलनाचा प्रयत्न झाला. परंतु पोलिसांनी तिघांना प्रतिबंधात्मक अटक केली. या सर्व १४ जणांना दुपारी पोलिसांना मुक्त केले.
३५० जणांना दिली नोटीस
रात्रीचे १० ते सकाळी ६ या दरम्यान शांतता भंग हाेणार नाही. यासाठी पोलिस प्रशासनाने मंदीर व प्रार्थनास्थळांना नोटीस दिली आहे. सुमारे ३५० जणांना ही नोटीस देण्यात आली आहे. शिवाय त्यांच्याकडून लेखी स्वरुपात हमीपत्र ही घेतले जाणार आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
गुप्त बैठकीत नियोजन
मनसेच्या आंदोलनाकडे पोलिसांचे लक्ष होते. शिवाय अनेकांना नोटीसही देण्यात आली होती. परंतु मनसे सैनिक आंदोलनावर ठाम होते. पोलिसांना चकवा देण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे एकाचवेळी व एकाच ठिकाणी आंदोलन केले नाही.
स्वस्फूर्तीनेही अंमलबजावणी
शहरातील अनेक प्रार्थना स्थळांनी सर्वाच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत सकाळी सहा वाजेपूर्वी होणारी प्रार्थना मंगळवारी व बुधवारी टाळली. तसेच दिवस भरात होणाऱ्या प्रार्थनेचा आवाज देखील कमी डेसीबलवर होता. स्वस्फूर्तीनेही अमंलबजावणी झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.