आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:पेट्रोल पंपावर लुटीचा प्रयत्न; दोघांना शस्त्रासह केले जेरबंद

धुळे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साक्री तालुक्यातील देवनगर शिवारातील पेट्रोल पंपावर पहाटे लुटीचा प्रयत्न झाला. या वेळी या ठिकाणी काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी प्रतिकार केला. तसेच पोलिस वेळेत आल्यामुळे दोघांना शस्त्रांसह अटक करण्यात आली. देवनगर शिवारात सुशांत सर्वाे पेट्रोल पंप आहे. या ठिकाणी रविवारी मध्यरात्री कर्मचारी कार्यरत होते. अडीच वाजेच्या सुमारास मोटारसायकलवर तीन जण आले. त्यांच्याजवळ कुऱ्हाड व अन्य शस्त्र होते. त्यांनी मॅनेजर सतीश उचाळे यांना कुऱ्हाडीने मारण्याची धमकी देत लॉकरची चावी मागितली. चावी देण्यास उचाळे यांनी विरोध केला.

त्यांच्या मदतीला नाना मारनर, युवराज मारनर, किरण नांद्रे व काही नागरिक धावून आले. या वेळी तिघांनी कुऱ्हाडीने वार करत पसार होण्याचा प्रयत्न केला. या वेळी एकाला पकडले. तसेच साक्री पोलिस ठाण्याचे गस्ती पथक आले. पथकाने आकाश शिवा थोरात (वय १९) तरुणाला शस्त्रांसह ताब्यात घेतले. दोघे पसार झाले. आकाशने जितेंद्र कैलास वेंदे, योगेश दगा मारनर (रा. इच्छापूर, ता. साक्री) यांचे नाव सांगितले. त्यानंतर पोलिसांनी पहाटे जितेंद्रला अटक केली. घटनेबद्दल साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. साक्री पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे, उपनिरीक्षक नऱ्हे, कर्मचारी निकम, कांबळे, साबळे, तुषार जाधव, सुनील अहिरे, चेतन अहिरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयित दोघांना दुपारी न्यायालयात उभे केले असता त्यांची पोलिस कोठडीत रवानगी झाली.

नंबरप्लेटवर लावला होता चुना
ओळख पटू नये यासाठी तिघांनी काळजी घेतली होती. पेट्रोल पंप व परिसराची पाहणी केली होती. तसेच पळ काढताना मोटारसायकलचा नंबर दिसून नये यासाठी नंबरप्लेटवर चुना लावला होता.

५ हजारांचे बक्षीस केले जाहीर
साक्री पोलिसांच्या कामगिरीमुळे पोलिस निरीक्षक कोकरे व पथकाला पाच हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...