आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासह स्थलांतरित विद्यार्थ्यांचे प्रमाण शून्यावर आणण्यासह बालविवाह प्रतिबंधासाठी विविध योजना राबवल्या जात आहे. या योजनेचा एक भाग म्हणून नवीन वर्षात जिल्हा परिषदेच्या १ हजार १९ प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची रोज फोटोबेस हजेरी घेतली जाईल. त्यासाठी स्वतंत्र मोबाइल अॅप विकसित करण्यात येते आहे. या अॅपसह फोटोबेस हजेरी कशी घ्यावी, याची माहिती देण्यासाठी साक्री आणि धुळे तालुक्यातील शिक्षकांचे प्रशिक्षण शिबिरही झाले.
जिल्ह्यातील चारही तालुक्यांत जिल्हा परिषदेच्या शाळांमधून प्राथमिक शिक्षण दिले जाते. या शाळांमधील काही विद्यार्थ्यांचे पालक रोजगारासाठी स्थलांतरित होताना मुलांनाही सोबत नेतात. तसेच विविध कारणांमुळे विद्यार्थी गळतीचे प्रमाण जास्त आहे. या प्रकाराला रोख लावण्यासह शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न होत आहे. त्यानुसार आता प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची फोटोबेस हजेरी होईल. त्यासाठी कल्याण येथील कोअर डेटा टेक्नाॅलॉजी कंपनीच्या मदतीने मोबाइल अॅप विकसित करण्यात येते आहे.
या अॅपच्या माध्यमातून शिक्षक रोज वर्गातील विद्यार्थ्यांचा फोटो घेऊन हजेरी नोंदवतील. हे अॅप चालवण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता नसेल. त्यामुळे नेटवर्क नसलेल्या शाळेतूनही शिक्षकांना विद्यार्थ्यांची फोटोबेस हजेरी घेता येईल. ज्या वेळेस शिक्षक नेटवर्कमध्ये येतील त्या वेळेस इन टाइम फोटो अपलोड होईल. फोटोबेस हजेरीमुळे नेमके किती विद्यार्थी गैरहजर असतात याची माहिती लगेच मिळेल. वारंवार गैरहजर राहणाऱ्या मुलांच्या पालकांचे समुपदेशन केले जाईल, अशी माहिती देण्यात आली.
सेस फंडातून दहा लाखांची तरतूद
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस. आयटी इंजिनिअर आहे. पदभार घेतल्यानंतर पहिल्या दिवसापासून त्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित केले आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांसाठी एकाच आनंददायी परिपाठ तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर शिक्षकांसाठी शाब्बास गुरुजी हा उपक्रम राबवला जातो आहे. त्यानंतर आता फोटोबेस हजेरी होणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून दहा लाख रुपये मंजूर झाले आहे.
शिक्षकांचा विरोध पण आता प्रतिसाद
फोटोबेस हजेरीच्या उपक्रमाला सुरुवातीला शिक्षकांनी विरोध दर्शवला. पण हा उपक्रम शिक्षा करण्यासाठी तर शैक्षणिक विकासासाठी असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस यांनी शिक्षक संघटनांची बैठक घेत स्पष्ट केले. त्यानंतर शिक्षकांचा विरोध मावळला. फोटोबेस हजेरीसाठी धुळे आणि साक्री तालुक्यातील शिक्षकांचे प्रशिक्षण झाले आहे.
नवीन वर्षात अॅप होणार कार्यरत
फोटोबेस हजेरी घेण्याचा उपक्रम नवीन वर्षात सुरू होणार आहे. या अॅपमुळे किती विद्यार्थी रोज गैरहजर राहतात याची माहिती रोजच्या रोज मिळेल. त्यामुळे विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे सोपे होईल. तसेच पटसंख्या वाढवण्यासाठी मदत होईल. राज्यात फोटोबेस हजेरी घेणारी धुळे जिल्हा परिषद पहिलीच आहे. -राकेश साळुंखे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.