आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिरपूर तालुका व महाराष्ट्रातील शेवटचे गाव असलेल्या गुऱ्हाळपाणीत मोबाइल नेटवर्क, वीजेची समस्या गंभीर आहे. मोबाइलला रेंज मिळवण्यासाठी नागरिकांना डोंगरावर जावे लागते. पण आता या गावात बीएसएनएल ४ जी मोबाइल टॉवर उभारणार आहे. या टॉवरमुळे गुऱ्हाळपाणी ग्रामपंचायतीच्या आठ पाड्यांमध्ये असलेली नेटवर्कची समस्या सुटेल. इंटरनेट सुविधेमुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेणे सोपे हाेईल. तसेच रेशन दुकानदारांना दिलासा मिळेल. कारण रेशन दुकानातूनही ई-पॉस मशिनच्या मदतीने धान्य वितरित होते.
या मशीनलाही इंटरनेटची आवश्यकता असते. शिरपूर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी असलेली गुऱ्हाळपाणी ग्रामपंचायत आणि ८ पाड्यांमध्ये वीज, मोबाइल नेटवर्कची समस्या गंभीर आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. कोरोना कालावधीत मोबाइल नेटवर्कसाठी टेकडीवर शाळा सुरु करण्यात आली होती. या शाळेतून गावातील विद्यार्थी डिजिटल शिक्षणाशी जोडले गेले होते. मोबाइल नेटवर्क मिळत नसल्याने रेशन दुकानदारांना धान्य वितरण करताना अडचण येते. त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना विविध योजनांची माहिती ऑनलाइन सादर करणे त्रासदायक होते. त्यामुळे या भागात बीएसएनएलच्या माध्यमातून ४ जी नेटवर्क सेवा सुरु करण्याचा निर्णय झाला आहे.
त्यासाठी बीएसएनएल स्वतंत्र टॉवर उभारणार आहे. टॉवर उभारण्यासाठी गावात गावठाण जागा नसल्याने अडचण येत होती. पण आता गावातील एका व्यक्तीने टाॅवर उभारण्यासाठी जागा देण्यास तयारी दर्शवली. त्यानंतर बीएसएनएलच्या शिरपूर येथील कर्मचाऱ्यांनी जागेची पाहणी केली. पाहणी नंतर टॉवर उभारण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली. येत्या काही दिवसात टॉवर उभारण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आता ४ जी नंतर ५ जी : गुऱ्हाळपाणीत ४ फोर जी टावर बीएसएनएल उभारणार आहे. भाविष्यात याच टॉवरवरून ५ जी सेवा देण्यात येईल. दुर्गम भागातील नेटवर्कची समस्या या टाॅवरमुळे संपेल, अशी माहिती बीएसएनएलचे कनिष्ठ अभियंता विजय चव्हाण यांनी दिली.
गावात आठ शाळा, सात अंगणवाड्या
गुऱ्हाळपाणी ग्रामपंचायतीच्या हद्दीत गुऱ्हाळपाणीसह आठ पाडे आहे. प्रत्येक पाड्यात प्राथमिक शाळा, अंगणवाडी आहे. या भागात मोबाइल नेटवर्क नसल्याने अंगणवाडी सेविका, मदतनीसांना ऑनलाइन माहिती सादर करण्यासाठी कसरत करावी लागते. नवीन टॉवर उभारल्यावर ही समस्या कायमची सुटण्यास मदत होणार आहे. टॉवर उभारला जाणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
धान्य वितरणाला फायदा
शासनाने रेशनच्या धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी ई-पॉस मशिन सुरु केले आहे. पण, गुऱ्हाळपाणी भागात नेटवर्क नसल्यामुळे हे यंत्र चालवताना अडचणी येत होत्या. मोबाइल टॉवर उभारल्यावर ही समस्या सुटेल. त्यामुळे धान्याचा काळाबाजार थांबण्यास मदत होणार आहे. दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पगमार्क ही ऑनलाइन हजेरीची प्रणाली सुरु केली आहे. पण या भागात नेटवर्क नसल्याने कर्मचाऱ्यांना ऑनलाइन हजेरी लावता येत नव्हती. आता हा प्रश्नही सुटेल. तसेच ई-पीक पाहणी अचूक होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.