आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रतीक्षेत; निवडणुकांसाठी बोरद परिसरात राजकीय हालचालीत वाढ

बोरदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बोरद परिसरातील बऱ्याच ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रतीक्षेत आहेत. ठिकठिकाणी प्रशासकीय राज कार्यान्वित आहे; परंतु प्रशासकीय काळात ग्रामपंचायतींमध्ये अनेक लोकांची कामे खोळंबलेली आहेत. लोकप्रतिनिधी कामे कर्तव्य म्हणून करत असतात; परंतु लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लोकांचा हिरमोड होत आहे.बोरद परिसरातील अनेक गावातील लोकप्रतिनिधींचे निवडणुकांकडे लक्ष लागून होते.

गेल्या अनेक दिवसांपासून निवडणुका जाहीर होत नव्हत्या. ओबीसी आरक्षणामुळे त्या खोळंबल्या होत्या. नुकताच न्यायालयाकडून निर्णय मिळाल्यामुळे आता अवघ्या काही महिन्यात निवडणुका होतीलच, या आशेवर ग्रामपंचायत अंतर्गत येणारे लोकप्रतिनिधी आपापल्या प्रभागानुसार असलेल्या आपल्या मतदारांना प्रभावित करण्यासाठी कामाला लागलेले दिसून येत आहेत. गेल्या दोन महिन्यांपूर्वी ओबीसी आरक्षण शिवाय निवडणुका घेता येणार नाही, असे न्यायालयाने जाहीर केल्यामुळे लोकप्रतिनिधींचीही निराशा झाली होती.

अनेक गावांमध्ये गप्पांचे फडही बंद झाले होते. तत्पूर्वी अनेक गावांमध्ये अनेक ठिकाणी लोकांच्या घोळक्यात लोकप्रतिनिधी दिसून येत होते. लोकप्रतिनिधीही आपल्या मतदारांना प्रभावित करण्यासाठी त्यांना चहा त्याचबरोबर नाष्टा देऊन जास्तीत जास्त मतदार आपल्या बाजूने कसे वळवता येतील याकडे प्रयत्नशील होते; परंतु न्यायालयाने निर्णय दिल्यामुळे लोकप्रतिनिधींची निराशा झाली होती.

आता पुन्हा न्यायालयाने निवडणुकांच्या तारखा लवकरात लवकर जाहीर करण्यासाठी निवडणूक विभागाला आदेशित केले आहे. त्यामुळे आता एक ते दोन महिन्यांमध्ये निवडणुका लागण्याची दाट शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता बोरद परिसरातील लोकप्रतिनिधींमध्ये पुन्हा उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधी मतदारांना भुलवण्यासाठी कामाला लागलेले आहेत.

बातम्या आणखी आहेत...