आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर

धुळे2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते शुभारंभ; चित्ररथाद्वारे जनजागृती

शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेल्या विविध लोककल्याणकारी योजना धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यातील लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी फिरता चित्ररथ तसेच एलईडी चित्ररथ तयार करण्यात आला आहे. या चित्ररथांना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी जनजागृती व्हावी, याकरिता जिल्हा माहिती कार्यालयाने जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विशेष घटक योजनेतून या चित्ररथांची निर्मिती केली आहे. या चित्ररथांचे जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर आणि समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त हर्षदा बडगुजर यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, माहिती सहायक गोपाळ साळुंखे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, शासकीय योजनांच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी फिरता चित्ररथ आणि एलईडी ही चांगली संकल्पना आहे. चित्ररथ व एलईडीच्या माध्यमातून योजनांची माहिती अधिक सुलभपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल.

जिल्हा नियोजन अधिकारी हटकर, समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त बडगुजर यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा माहिती अधिकारी बोडके यांनी चित्ररथ व एलईडी चित्ररथाची संकल्पना सांगितली. या चित्ररथावर सामाजिक न्याय विभागाच्या रमाई आवास योजना (घरकुल), गटई कामगारांना पत्राचा स्टॉल, मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृहे, समाजकल्याण संस्थांना अनुदान, भारत सरकार शिष्यवृत्ती, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व विद्यावेतन, सैनिक शाळेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, मोटार वाहन चालक प्रशिक्षण, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवकांसाठी सैन्य व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, अनुसूचित जातीच्या सहकारी औद्योगिक संस्थांना अर्थसाहाय्याची योजना, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आदी योजनांची माहिती या फिरता चित्ररथ तसेच एलईडी चित्ररथाद्वारे व जिंगल्सद्वारे ग्रामीण भागात पोहोचवली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...