आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:प्लास्टिकबंदी, कोरोना लसीकरणावर जागृती

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्यपूर्व काळापासून गणेशोत्सवाची परंपरा जोपासणाऱ्या शहरातील श्रीमंत स्वतंत्र भांग्या मारुती गणेश मंडळातर्फे यावर्षी विविध क्षेत्रात लौकिक प्राप्त करणाऱ्या दिवंगत सामाजिक कार्यकर्त्यांचा मरणोत्तर पुरस्कार देऊन सत्कार केला जाणार आहे. मंडळाने पुढील वर्षी मंदिर उभारण्याचा संकल्प केला आहे. या मंदिरात चांदीची गणेशमूर्ती असेल. दोन वर्षांपासून मंडळातर्फे कोरोना व लसीकरणाविषयी जनजागृती केली जाते आहे. तसेच प्लास्टिक बंदीसाठीही मंडळाने पुढाकार घेतला आहे.

शहरातील गल्ली क्रमांक सहामध्ये स्वतंत्र भांग्या मारुती व्यायामशाळा रामभाऊ करनकाळ यांनी स्थापन केली. त्यानंतर किसनराव करनकाळ व आता प्रथम महापौर भगवान करनकाळ व्यायामशाळेचे कामकाज पाहत आहे. व्यायामशाळेच्या माध्यमातून दहीहंडी, शिवजयंती, होळी, गणेशोत्सव आदी सण साजरे होतात. स्वातंत्र्यपूर्व काळापासून मंडळातर्फे गणेशोत्सव होतो. मंडळाने लोकसहभागातून ६३ किलोची चांदीची गणेशमूर्ती तयार केली आहे. नाशिक येथील कारागिरांनी तीन वर्षांत ही मूर्ती साकारली. सन २००० पासून याच मूर्तीची गणेशोत्सवात प्रतिष्ठापना केली जाते. मंडळातर्फे कर्करोग तपासणी, मोतीबिंदू, रक्तदान शिबिर, गरजूंना धान्य वाटप,भांडे वाटप आदी उपक्रम दरवर्षी राबवले जातात. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन, बेटी बचाव बेटी पढाव, स्त्री-भ्रूण हत्या रोखणे, पर्यावरण संवर्धन, आतंकवाद आदी विषयांवर प्रबोधन केले जाते आहे.

समाजरत्नांचा करणार सत्कार मंडळातर्फे यावर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या २० समाजरत्नांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. त्यात १० जणांना मरणोत्तर गौरवण्यात येणार आहे. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, विधी, धार्मिक, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष भगवान करनकाळ यांनी दिली.

चांदीच्या मूर्तीसाठी मंदिर उभारणार
गणेश मंडळाच्या चादींच्या मूर्तीसाठी पुढील वर्षी मंदिर उभारण्यात येणार आहे. तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतील. अनाथ मुलांना मोफत कुस्तीचे प्रशिक्षण देणे, मुलींना स्वसंरक्षणासाठी ज्युदो-कराटेसह लाठीकाठी चालवण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती भगवान करनकाळ यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...