आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जनजागृतीमुळे वर्षभरात रोखले 28 बालविवाह

धुळे6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाच्या सन २०१९-२० या वर्षाच्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात धुळे जिल्हा बालविवाहात राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे समोर आले होते. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा, सामाजिक संस्थांनी बालविवाहच्या विरोधात जनजागृती सुरू केली. त्यामुळे बालविवाह थोपवण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. वर्षभरात चाइल्ड लाइनवर बालविवाहाच्या २८ तक्रारी आल्या. महिला बालविकास विभाग, बालकल्याण समिती आणि पोलिसांच्या मदतीने तक्रारींची शहानिशा करून २८ बालविवाह रोखण्यात आले.

लग्नसराई सुरू झाली असून या काळात बालविवाह होण्याचा प्रकारही घडू शकतो. दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्य प्रा. संजय पाटील यांनी बालविवाह विषयी चिंता व्यक्त केली. या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस यांनी १०९८ या चाइल्ड हेल्पलाइनवर तक्रार करण्याचे आवाहन केले. बालविवाह रोखण्यासाठी अंगणवाडी, आशासेविका, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्यांना प्रशिक्षण दिले आहे.

शाळांमध्येही जागृती होते आहे. जिल्ह्यात सन २०१९-२० पर्यंत बालविवाहाचे प्रमाण जास्त होते. वर्षभरात चाइल्ड लाइनकडे २८ तक्रारी आल्या. त्यात नोव्हेंबर, डिसेंबर २०२१ आणि जानेवारी २०२२ मध्ये प्रत्येकी दोन, फेब्रुवारीत ४, मार्चमध्ये २, एप्रिलमध्ये ५, मे महिन्यात ६, ऑगस्टमध्ये १, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये प्रत्येकी दोन तक्रारींचा समावेश होता. तक्रारींची शाहनिशा २८ बालविवाह रोखण्यात आल्याचे सांगण्यात आले.

प्रबाेधनासाठी २५ शाळांची निवड
बालविवाह रोखण्यासाठी व्यापक मोहीम सुरू झाली आहे. प्रशासन, युनिसेफ, महिला आणि बालविकास विभाग, एसबीसी ३, सप्तशृंगी महिला संस्था, चाइल्ड लाइन पथकाने जागृती केली. ज्या भागात सर्वाधिक बालविवाह झाले. त्या भागातील २५ शाळांमधील मुलींचे समुपदेशन करणे, पालकांची भेट घेणे, प्रशिक्षण आदी उपक्रम राबवले जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कायद्यानुसार गुन्हा होऊ शकतो दाखल
बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार १८ वर्षापेक्षा लहान युवती व २१ वर्षापेक्षा लहान युवकाचा विवाह करता येत नाही. बालविवाह लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. बालविवाह मान्य नसल्यास न्यायालयात अर्ज करून विवाह रद्दबातल करता येतो. बालवधूला पतीकडून किंवा तो अज्ञान असल्यास सासऱ्याकडून पोटगी मिळू शकते. तसेच पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. बालविवाह थांबवण्यासाठी १०९८ क्रमांकावर चाइल्ड लाइनकडे तक्रार करता येते.

प्रबोधनामुळे तक्रारी वाढल्या
चाइल्ड लाइनच्या माध्यमातून बालविवाहाच्या २८ तक्रारी प्राप्त झाल्या. महिला आणि बालविकास विभाग, बालकल्याण समिती, पोलिस प्रशासनाच्या मदतीने २८ बालविवाह रोखले. प्रबोधनामुळे बालविवाह विरोधात तक्रारींची संख्या वाढली आहे.-मीना भाेसले, अध्यक्षा: सप्तशृंगी महिला संस्था तथा चाइल्ड लाइन प्रोजेक्ट

बातम्या आणखी आहेत...