आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाविकास आघाडीला 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 38 जागांवर तर विधानसभेच्या निवडणुकीत 180 जागांवर विजय मिळेल असा विश्वास काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. तर मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली असल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे.
धुळे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने एक मेळावा आयोजित केला होता. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांकडं पाठ फिरवली
बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्यात एकीकडे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान होत आहे. अशातच दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अयोध्येचा दौरा करत आहेत. जेव्हा कुटुंबातील सर्व परिस्थिती चांगली असते तेव्हा देवदर्शनाला जावे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली आहे.
अजित पवारांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष
ईव्हीएम मशीनवर माझा विश्वास असल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले होते. अजित पवारांच्या या वक्तव्याची राज्यभर चर्चा झाली होती. याबाबतही बाळासाहेब थोरात यांना विचारण्यात आले, त्यावेळी थोरात म्हणाले की, जेव्हा निवडणुकीचा निकाल समोर येतो तेव्हा ईव्हीएम मशीनबाबत संशय निर्माण होतो. कुणी काय बोलावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे सांगत बाळासाहेब थोरात यांनी अजित पवारांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष केले.
एकजुटीने काम केले तर अधिक जागा मिळतील
कसब्याच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील विधानसभेला महाविकास आघाडी 200 पेक्षा जास्त जिंकेल असा विश्वास व्यक्त केला होता. 2024 निवडणुकीत महाविकास आघाडीने एकजुटीने काम केले तर विधानसभेला महाविकास आघाडीच्या 200 पेक्षा जास्त जागा मिळतील. तर लोकसभेच्या किमाना 40 तरी जागा आम्ही जिंकू असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आता बाळासाहेब थोरातांनी देखील 180 पेक्षा जास्त जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.