आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्री-वेडिंग फोटोग्राफी करताना पाश्चिमात्य पद्धतीचे कपडे वधूला घालायला लावणे आणि वर-वधूंच्या वैयक्तिक क्षणांचे फोटो काढणे, त्याचे प्रदर्शन लग्न समारंभात मोठ्या डिजिटल पडद्यावर करणे या चुकीच्या गाेष्टींचे अंधानुकरण होते आहे. त्यामुळे प्री-वेडिंग शूटिंग आणि त्याचे मोठ्या पडद्यावरील प्रक्षेपण याला यापुढे नकार द्यावा, असा निर्णय नंदुरबार जिल्ह्यातील गुरव समाजाने घेतला आहे. लग्न वेळेवर लावण्याबाबतही काळजी घेण्याचा निर्णय पाच हजार जणांच्या उपस्थितीत रविवारी सायंकाळी घेण्यात आला आहे. नंदुरबारच्या इंदिरा कॉम्प्लेक्समध्ये दोनदिवसीय दाहीगाव गुरव समाजाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा व विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे आदिवासी विकासमंत्री डाॅ. विजयकुमार गावीत, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत हा गुणगौरव सोहळा पार पडला. त्याआधी गुरव समाज संघटनेची बैठक झाली. त्यात अध्यक्ष सुधाकर रमेश गुरव यांनी हा प्रस्ताव मांडला. सर्वांनीच तो तत्परतेने मान्य केला.
समाज भवनासाठी झाली चर्चा सचिवपदी सारंगखेडा येथील संजय गुरव यांची तर बांधकाम समिती अध्यक्षपदी भूपेंद्र गुरव यांची निवड करण्यात आली. समाज भवन निर्माण करण्यावर या वेळी चर्चा करण्यात आली.
सामुदायिक विवाहासाठी प्रयत्न साखरपुड्याचा कार्यक्रम थोडक्यात करावा, कमी लोकांना लग्नाला घेऊन जावे, फक्त पाचच साड्या घ्याव्या, अनावश्यक खर्च वाचण्यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी प्रयत्न करावा, मंदिरांत लग्नास प्राधान्य द्यावे, लग्नात आहेर मोजके व जवळच्या नातेवाइकांना द्यावा, असे ठराव करण्यात आलेे. मरणोत्तर देहदान करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सतीश गुरव यांचा सत्कार करण्यात आला. उत्तरकार्य करतानादेखील जवळच्या नातलगांनीच टोप्या द्याव्यात, कारण त्या टोप्या नंतर पडून राहातात, असाही प्रस्ताव आला. तोही या वेळी सर्वानुमते संमत करण्यात आला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.