आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनंत चतुर्दशी:बाप्पा तुच सुबुद्धी दे, अनंत चतुर्दशी 5 दिवसांवर, रस्त्यांवर खड्डे जैसे थे

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सवाला ३१ ऑगस्टपासून प्रारंभ झाला. शहरात पाचव्या, सातव्या दिवसासह अनंत चतुर्दशीला गणेशमूर्तींचे विसर्जन होते. विसर्जनासाठी महापालिकेतर्फे नियोजन सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी विसर्जन स्थळांसह प्रमुख रस्त्यांची महापौर प्रदीप कर्पे व आयुक्त देविदास टेकाळे यांनी पाहणी केली. दुसरीकडे काही रस्त्यांवरील खड्डे बुजवलेले नाही. नवरंग जलकुंभासमोरील रस्ता खराब झाला आहे. आयटीआय, विटाभट्टी, पांझरा काठावरील रस्त्यांवरही खड्डे तसेच आहे. ते बुजवण्याचा मुहूर्त महापालिकेला मिळणार कधी असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

गणेशोत्सवाला प्रारंभ झाला असून, देखावे पाहण्यासाठी नागरिकांची आता गर्दी होते आहे. तसेच शहरात दीड व तीन दिवसाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. त्यानंतर उद्या रविवारी पाचव्या दिवशी दुसऱ्या टप्प्यातील, सातव्या दिवशी मंगळवारी तिसऱ्या टप्प्यातील व अंनत चतुर्दशीला शेवटच्या टप्प्यातील विसर्जन होईल. बहुतांश मंडळातर्फे यंदा विसर्जन मिरवणुका काढण्यात येणार आहे. दुसरीकडे आग्रारोडसह अन्य रस्त्यावर अद्यापही खड्डे तसेच आहे. आग्रारोडने विसर्जन मिरवणुका हत्तीडोहाकडे जातात. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवण्याची आवश्यकता आहे.

१५८ कर्मचारी नियुक्त : विसर्जनासाठी स्वच्छता निरीक्षक व त्यांच्या नियंत्रणात १५८ कर्मचारी तैनात असतील. हत्तीडोह येथे प्रखर विद्युतझोत लावले जातील. आरोग्य पथक : महात्मा गांधी चौकातून विसर्जन मिरवणूक जातील. त्यामुळे या ठिकाणी महापालिकेचा स्वागत कक्ष व वैद्यकीय पथक नियुक्त असेल.

या ठिकाणी आहेत खड्डे
आग्रारोड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहे. या रस्त्यावर देवपुरात एल.एम. सरदार हायस्कूलसमोर, देवपूर बसस्थानकाच्या अलीकडे पेट्रोल पंपाकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ, नवरंग जलकुंभासमोर, आयटीआय समाेर खड्डे आहे. तसेच पांझरा किनारी असलेल्या रस्त्यावरही अनेक ठिकाणी खड्डे आहे.

पाहणी करून आढावा
शहरात पाचव्या दिवशी दुसऱ्या टप्प्यातील विसर्जन होते. या पार्श्वभूमीवर महापौर प्रदीप कर्पे, आयुक्त देविदास टेकाळे यांनी शनिवारी विसर्जन स्थळांची पाहणी केली. या वेळी उपमहापौर अनिल नागमोते, महिला बालकल्याण समितीच्या उपसभापती आरती पवार, पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकडे, पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे आदी उपस्थित होते.

प्रश्न : खड्डे बुजवण्यास विलंब होण्याचे नेमके कारण काय?
उत्तर : मुख्य रस्ते बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहे. देवपुरातील रस्ते दुरुस्तीची सूचना मजीप्राला केली होती. नियोजनात वेळ गेला.
प्रश्न : सर्व खड्डे बुजवण्याचे काम वेेळेत पूर्ण केले जाईल काय?
उत्तर : खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे. वेळेत काम पूर्ण केले जाईल.
प्रश्न : खड्डे हॉटमिक्सने बुजवणार आहे का फक्त मुरूम टाकणार?
उत्तर : डांबराचे प्लँट बंद असल्याने डांबर मिळण्यास अडचणी येत आहे. खडीकरणावर डांबरचा बारीक थर टाकून खड्डे बुजवले जातील.
प्रश्न : सर्व रस्त्यांची दुरुस्ती मनपा प्रशासन करणार आहे काय?
उत्तर : सद्य:स्थितीत विसर्जन मिरवणूक मार्गावर खड्डे बुजवण्यास प्राधान्य आहे.

बातम्या आणखी आहेत...