आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुस्ती स्पर्धा:दिल्लीचा भोला चीत, महाराष्ट्राचा शेख ‘सिकंदर; लक्षवेधी स्पर्धेत इराणच्या इब्राहिमचा पराभव, धुळ्यात तब्बल दोन वर्षांनंतर रंगल्या स्पर्धा

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्री छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय राष्ट्रीय तालीम संघातर्फे माजी नगराध्यक्ष दिलीप जगताप यांच्या स्मरणार्थ गरुड मैदानात खुली कुस्ती स्पर्धा झाली. या स्पर्धेत दिल्लीचा भोला पंजाबी आणि महाराष्ट्राचा सिकंदर शेख यांच्यात अंतिम लढत झाली. या लढतीत अवघ्या चार मिनिटांत सिकंदरने भोला पंजाबीला अस्मान दाखवत मानाची गदा पटकावली. दुसऱ्या सामन्यात इराणचा मल्ल इब्राहिमचा पुण्याचा मल्ल महेंद्र गायकवाडने पराभव केला.

स्पर्धेचे उद्घाटन खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार कुणाल पाटील, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, शरद पाटील, महापौर प्रदीप कर्पे, शिवसेनेचे धुळे व नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख बबन थोरात, माजी महापौर भगवान करनकाळ, चंद्रकांत सोनार, शिवछत्रपती पुरस्कारार्थी गोविंद पवार, शिवसेनेचे महानगर प्रमुख मनोज मोरे, सतीश महाले, जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, राहुल जगताप, केतन जगताप, दिनेश जगताप, राकेश जगताप आदी उपस्थित होते. स्पर्धेला रात्री आठ वाजता प्रारंभ झाला. एकूण ३१ सामने झाले. स्पर्धेत सर्वाधिक लक्षवेधी लढत दिल्लीचा भोला पंजाबी विरुद्ध कोल्हापूरचा सिकंदर शेख यांच्यात झाली. या सामन्यात भोला पंजाबीने सुरुवातीची तीन मिनिटे शेखवर चढाई केली.

त्यामुळे कुस्तीचा एकतर्फी निकाल लागतो की काय असे चित्र निर्माण झाले होते. तसेच भोला पंजाबीने कैचीचा डाव टाकून सिकंदर शेखला गारद करण्याचा प्रयत्न केला. पण सिकंदर शेखने कैची तोडत पंजाबीचा डाव त्याच्यावर उलटवत त्याला चितपट करत मानाच्या गदेवर नाव कोरले. हा सामना झाल्यावर प्रेक्षकांनी थेट मैदानात धाव घेत सिकंदरला खांद्यावर घेत जल्लोष केला. पंच म्हणून संजय गिरी, मुरलीधर रोकडे, श्याम कानडे यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...