आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:भोंग्याच्या राजकारणाचे चटके तमाशा कलावंतांनाही; यापूर्वी कोरोनामुळे दोन वर्ष मिळाला नव्हता रोजगार

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसापासून भोंग्याचे राजकारण तापले आहे. त्याचा फटका तमाशा कलावंत व फड मालकांही बसण्यास सूरवात झाली आहे. कारण रात्री दहा वाजेनंतर भोंगा लावल्यास कारवाई केली जाते. त्यामुळे तमाशा कलावंत व फड मालकांसमोर पुन्हा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी कोरोनामुळे दोन वर्ष तमाशा सादरीकरणावर निर्बंध होते.

सोशल मिडीयाच्या युगातही ग्रामीण भागात तमाशाची क्रेझ कायम आहे. कोरोनामुळे दोन वर्षापासून यात्रांसह तमाशा सादरीकरणावर निर्बंध होते. आता सर्व निर्बंध उठले आहे. तसेच यात्रांचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे तमाशा कलावंताना रोजगार मिळतो आहे. दुसरीकडे राज्यात काही दिवसापासून भोंग्याचे राजकारण तापले आहे. रात्री दहा वाजेनंतर भोंगे वाजवण्यास मनाई आहे. या नियमाच फटका आता थेट तमाशा फड मालक आणि कलावंताना बसतो आहे. यात्रेत तमाशाचे प्रयोग रात्री ९.३० ते १० वाजेनंतर सुरु होतात. पण धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यांमध्ये काही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत तमाशासाठी भोंगे लावण्यावर बंदी आहे.

त्यामुळे रात्री तमाशा सुरु होण्यापूर्वीच पोलिस नोटीस घेऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी येतात. भोंगे लावू नये अशी सूचना करतात. सर्वाेच्च न्यायालयाने घालुन दिलेल्या अटी शर्थीचे पालन करुन आवाजाची पातळी ठेवावी. रात्री १० वाजेनंतर ध्वनीक्षेपकाशिवाय कार्यक्रम सादर करता येतील पण आवाजाविषयी तक्रार झाल्यास कारवाईचा इशारा पोलिसांकडून देण्यात येतो. भोंगे लावले नाही तर तमाशाची रंगत नाही व नियम पाळला तर कार्यक्रम होणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रश्नावर तोडगा काढावा, अ शी मागणी तमाशा कलावंत, फडमालकांनी केली आहे.

दोन वर्ष उपेक्षा,आता बसतोय फटका
कोरोनामुळे अनेक फड बंद पडले. काम नसल्याने तमाशा कलावंतावर धुणीभांडी करण्यासह मोलमजूरी, सेंट्रीग काम करण्याची वेळ आली. शासनाने दोन वर्ष तमासगीरांना कोणतीही मदत केली नाही. सामाजीक संस्थांनी दिलेला मदतीवर दोन वर्ष निघाली. आता यात्रांमुळे तमाशे पुन्हा झालेले होते. पण भोंग्यामुळे ते पुन्हा अडचणीत आले आहे.

खान्देशात १६ फड कार्यरत
खान्देशात १६ पूर्णवेळ तमाशा फड कार्यरत आहे. त्यात धुळे जिल्ह्यातील सहा आणि जळगाव जिल्ह्यातील दहा फडांचा समावेश आहे. प्रत्येक फडात नर्तकी, नाच्या, सोंगाड्या, पेटीवाला, वाजंत्री यांच्यासह इतर कलावंत आणि मजूर मिळून ५० जण असतात. या पन्नास जणांवर त्यांच्या कुटूंबाचा भार असल्याची माहिती तमाशा कलावंतातर्फे देण्यात आली आहे.

शासनाने धोरण निश्चित करावे
कोरोना संकटाला तमाशा कलावंत आणि फड मालकांनी तोंड दिले. आता भोंग्याच्या राजकारणाचा फटका तमाशांना बसतो आहे. या संकटातून वाट काढणे अवघड आहे. तमाशा आणि सांस्कृतीक कार्यक्रमासाठी भोंग्याचे धोरण निश्चित करण्याची गरज आहे.
शेषराव गोपाळ, खान्देश लोककला अकादमी

बातम्या आणखी आहेत...