आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:भाजपचा वरचष्मा; शिंदे गटाचीही एन्ट्री

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील १२८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. राज्यात झालेल्या सत्तांतरामुळे ही निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरली हाेती. शिरपूर तालुक्यात नेहमीप्रमाणे आमदार अमरीश पटेल यांचा करिश्मा कायम राहिल्याने या ठिकाणी भाजपने सर्व १७ ग्रामपंचायतींवर एकहाती सत्ता मिळवली.

शिंदखेडा तालुक्यात आमदार जयकुमार रावल यांनी १४ ग्रामपंचायती ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. धुळे तालुक्यात आमदार कुणाल पाटील यांनी २५ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. साक्री तालुक्यात शिवसेनेच्या शिंदे गटाने काही ग्रामपंचायतीत मुसंडी मारली. एकंदरीत या निवडणुकीत जिल्ह्यात भाजपचा वरचष्मा राहिला. पण जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व असलेल्या काही नेत्यांना त्यांचा समर्थकांचा पराभव झाल्याने धक्का बसला.

जिल्ह्यातील १२८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यातून १० ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे रविवारी ११८ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले हाेते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत सर्वच लोकप्रतिनिधींची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मतमोजणी मंगळवारी झाली. निवडणुकीत भाजपला महाविकास आघाडीने जोरदार टक्कर दिली आहे. ही स्थिती असली तरी भाजपची सरशी झाल्याचे दिसून आले. शिरपूर तालुक्यात सर्व १७ ग्रामपंचायतींवर भाजपचे आमदार अमरीश पटेल यांनी एकहाती सत्ता मिळवली.

शिंदखेडा तालुक्यात आमदार जयकुमार रावल यांनी १४ ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा रोवला आहे. शिंदखेडा तालुक्यात काँग्रेसला १, राष्ट्रवादीला २, शिवसेना ठाकरे गटाला २, स्थानिक विकास आघाडीला ५ ग्रामपंचायती मिळाल्याचा दावा होतो आहे. धुळे तालुक्यात काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्या गटाने २५ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. दुसरीकडे भाजपनेही १७ ग्रामपंचयतीवर दावा केला आहे. बोरकुंड ग्रामपंचायतीत बाळासाहेब भदाणे यांनी वर्चस्व कायम ठेवले. भाजपने बालेकिल्ला असलेल्या फागणे, नगाव येथे सत्ता राखली. निकालानंतर विविध गावांमध्ये विजयी उमेदवारांनी एकच जल्लोष केला.

कासारे ग्रामपंचायतीत देसले यांची सत्ता कायम
साक्री तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या कासारे ग्रामपंचायतीत शिंदे गटाचे विशाल देसले यांनी सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. धुळे तालुक्यातील नगाव ग्रामपंचायतीत जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे यांच्या आई तथा माजी आमदार द. वा. पाटील यांच्या स्नुषा ज्ञानज्योती भदाणे सलग दुसऱ्यांदा सरपंच म्हणून विजयी झाल्या. साक्री तालुक्यातील भाडणे गावात अजय सोनवणे या तरुणाने सत्ताधाऱ्यांचे पानिपत करत १५ पैकी १३ जागांसह सरपंचपदावर विजय मिळवला.

ईश्वरचिठ्ठीने दलीबाई सोनवणेंचे नशीब उघडले
साक्री तालुक्यातील पांगण ग्रामपंचायतीत सरपंचपदाच्या निवडणुकीत रेखाबाई खंडू गायकवाड आणि दलीबाई सखाराम सोनवणे यांना प्रत्येकी ७०८ मते मिळाली. अखेर ईश्वर चिठ्ठी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. ईश्वरचिठ्ठीच्या साथीने दलीबाईच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली. धुळे तालुक्यातील सैताळे ग्रामपंचायतीच्या एका वाॅर्डात रत्नाबाई कांतिलाल पाटील आणि शोभाबाई छगन पाटील यांना २१५ असे समान मते पडल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. त्यात रत्नाबाई पाटील यांचा विजय झाल्याची माहिती देण्यात आली.

चर्चेतील गावांचा निकाल
नरडाणा :
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा ग्रामपंचायतीत जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण सभापती संजीवनी सिसोदे यांच्या पॅनलला पराभवचा सामना करावा लागला.

चिमठाणे : शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे आणि कलमाडी गावातही जिल्हा परिषद सदस्यांच्या पॅनलला फटका बसला.

नेवाडे : शिंदखेडा तालुक्यातील नेवाडे येथे राष्ट्रवादीचे माजी आमदार रामकृष्ण पाटील यांच्या पॅनलचा पराभव झाला. या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांच्या पॅनलने विजय मिळवला.

करवंद : शिरपूर तालुक्यातील करवंद गावात जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्या पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. ते आमदार अमरीश पटेल यांचे समर्थक आहे.

थाळनेर : सरपंचपदासाठी प्रतिभा भगवान मराठे व मेघा संदीप पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली. अपक्ष उमेदवाराने घेतलेली मते व जातीय समीकरणामुळे मेघा संदीप पाटील थोड्या मतांच्या फरकाने विजयी झाल्या. पराभूत होऊनही प्रतिभा भगवान मराठे यांची चर्चा होती. या निवडणुकीत मेघा संदीप पाटील यांनी ८७ मतांनी विजय झाला.

वाघाडी : भाजपचे तालुकाध्यक्ष किशोर‎ विठ्ठल माळी गेल्या निवडणुकीत‎ शिरपूर तालुक्यातील वाघाडीतून पराभूत झाले होते.‎ त्यामुळे या निवडणुकीत‎ त्यांच्याविषयी नागरिकांमध्ये‎ सहानुभूती होती. त्याचा त्यांना‎ फायदा झाला. त्यांनी सरपंचपदाच्या‎ निवडणुकीत १ हजार ६६० मते‎ मिळवत विजय मिळवला.‎ या ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाकडे अनेकांचे लक्ष लागून होते.

बातम्या आणखी आहेत...