आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई-आग्रा महामार्गावरील बाभळे फाटा ते सोनगीर दरम्यान सोमवारी पहाटे दरोडेखोरांनी रस्त्यावर लाकडाचा ठोकळा फेकत कार अडवली. त्यानंतर कारमध्ये बसलेल्यांना मारहाण करत शस्त्राचा धाक दाखवत सव्वा लाखांचा ऐवज लुटला. घटनेनंतर कारमधील भेदरलेल्यांनी सोनगीर पोलिस ठाणे गाठत आपबिती सांगितली. याप्रकरणी सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करून तो शिंदखेडा पोलिसांकडे वर्ग झाला.
शिरपूरहून धुळ्याकडे येणारी कार मुंबई-आग्रा महामार्गावरील बाभळे फाटा व सोनगीरपासून सुमारे दोन किमी अंतरावर दरोडेखोरांनी अडवली. कारमध्ये चार पुरुषांसह दोन महिला होत्या. दरोडेखोरांनी पुरुषांना धमकावत त्यांच्या जवळील रोकड तर महिलांच्या अंगावरील दागिने ओरबाडण्याचा प्रयत्न केला. लुटारूंनी ७३ हजारांचे दागिने, ५७ हजार ५०० रोख असा १ लाख ३० हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून नेला.
कारमध्ये नाशिक येथील कैलास भिवसन जाधव व त्यांच्या कुटुंबातील सदस्य होते. ते इंदूर येथे गेले होते. परतीच्या प्रवासात हा प्रकार घडला. घटनेनंतर भेदरलेल्या जाधव कुटुंबातील सदस्यांनी सोनगीर पोलिस ठाणे गाठले. तसेच आपबिती सांगितली.
त्यानंतर घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, एलसीबीचे निरीक्षक शिवाजी बुधवंत, शिरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने, शिंदखेडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील भाबड, एपीआय प्रशांत गोरावडे, पोलिस नाईक सदेसिंग चव्हाण, गांगुर्डे, सोनगीर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील, पीएसआय रवींद्र महाले आदींनी भेट दिली. या प्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल करून तो शिंदखेडा पोलिस ठाण्याकडे वर्ग झाला आहे. पोलिस निरीक्षक सुनील भाबड तपास करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.