आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान दिन विशेष:36 वर्षांपासून रक्तदान; आता कुटुंबही सरसावले

धुळे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुकानात औषधे घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला पटेल यांचा रक्तदानाचा सल्ला

रक्तदान हेच जीवनदान आहे. आम्ही नियमित रक्तदान करतो तुम्हीही करा अन् इतरांनाही सांगा, असा सल्ला औषधे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना हेमंत पटेल आवर्जून देतात. हेमंत पटेल यांनी १९८६ पासून रक्तदान करण्यास सुरुवात केली. त्यांच्या रक्तदानाचा वारसा कुटुंबातील सदस्यांनीही अविरत सुरू ठेवला आहे. बी पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या हेमंत पटेल यांची रक्तदानाविषयी असलेली सकारात्मक विचारसरणी इतरांनाही प्रेरणा देणारी आहे.

शहरातील महावीर सोसायटीत राहणारे हेमंत नटवरलाल पटेल यांचे औषध विक्रीचे दुकान आहे. गरजूंना रक्तदानासाठी मदत करणारे अशी त्यांची स्वतंत्र ओळख आहे. हेमंत पटेल यांचे वय ५४ वर्षे असून ते नियमित रक्तदान करतात. सन १९८६ पासून त्यांनी रक्तदानाला सुरुवात केली. त्यावेळी जवळच्या एक नातलगाला रक्ताची गरज असल्यामुळे त्यांनी रक्तदान केले होते. गरज आणि रक्तदान केल्यावर मिळालेले समाधान हीच त्यांच्यासाठी प्रेरणा ठरली.

आत्तापर्यंत त्यांनी ८६ गरजूंना रक्तदान केले. त्यांचा हाच वारसा पत्नी जिगेशा पटेल व मुलगी मिताली यांनी सुरू ठेवला आहे. जिगेशा पटेल यांनी आत्तापर्यंत ८ वेळेस तर मितालीने सुमारे १५ वेळेस रक्तदान केले आहे. कुटुंबातील सर्वात लहान असलेली १८ वर्षाची दिया रक्तदानासाठी उत्साही आहे. हेमंत पटेल यांचे औषधांचे दुकान आहे. दुकानात येणाऱ्या ग्राहकांना ते नियमित रक्तदान करण्याचा सल्ला आवर्जून देतात. रक्तदान चळवळीतील पटेल कुटुंबीयांचा उत्साह पाहून अनेक जण रक्तदानासाठी प्रेरित झालेे. भविष्यातही रक्तदानाचा वसा सुरू ठेवणार असल्याचे पटेल कुटुंबीय सांगतात.

रक्ताने ऋणानुबंध घट्ट
जवळच्या एका मित्राच्या कुटुंबातील सदस्य थॅलेसिमियाग्रस्त निघाला. त्यावेळी रक्तदानासाठी फारसे कोणी पुढे येत नव्हते. त्याच्यासाठी रक्तदान केले. रक्तदान केलेल्या अनेक कुटुंबाशी ऋणानुबंध घट्ट झाले, असा अनुभव हेमंत पटेल व कुटुंबीयांनी सांगितला.

समाधान शब्दांपलीकडे
रक्तदानानंतर मिळणारे समाधान शब्दात मांडता येणारे नाही. माझ्या मते गरजूला यापेक्षा मोठी मदत होऊ शकत नाही. कुटुंबातील तिघे रक्तदान करत असून लहान मुलगी दिया रक्तदानासाठी उत्साही आहे.
हेमंत पटेल, रक्तदाता

बातम्या आणखी आहेत...