आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रारीवरून चौकशी:शाखा अभियंत्यांनी गावात जाऊन केली चौकशी; बेटावदला पाणीपुरवठ्याची कामे निकृष्ट झाल्याचे चौकशीतून उघड

कापडणे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा तालुक्यातील बेटावद गावात ग्रामसेवक व सरपंच यांच्या संगनमताने विविध कामांची बिले कामे न करता काढण्यात आली. तर काही कामे फक्त नावालाच निकृष्टपणे करण्यात आली आहेत. याबाबत शिंदखेडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी संबंधित कामांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. बुधवारी पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पाहणी करण्यात आली. या वेळी भूमिगत गटारींचे काम, आर.ओ. पिल्टर, बोअरवेल कामांची प्राथमिक तपासणी केली. या वेळी अनेक कामे झाली नसताना देखील बिले काढण्यात आल्याचे उघड झाले आहे. तपासणी अधिकाऱ्यांनी सविस्तर अहवाल शिंदखेडा गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठवला आहे. यावेळी तपासणी अधिकारी शाखा अभियंता आर.एस. देसले, बेटावद येथील तक्रारदार अनिल महाले, प्रभाकर कोष्टी, कमलेश माळी, विष्णू सैंदाणे, राजेंद्र कोळी, संदीप पवार, विनोद वडार, गणेश सोनार, मोतीराम भोई, अशोक वाघ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

अशी झाली बोगस कामे
बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शाखा अभियंता आर. एस. देसले हे बेटावद गावात चौकशीसाठी आले. या वेळी ग्रामपंचायतीने चार बोअरवेल केली आहेत. या बोअरवेलमध्ये विद्युत पंप, वायर आदी साहित्य न टाकता बिले हडप करण्यात आली आहेत. तर गावातील वॉर्ड क्रमांक पाच आणि सहामध्ये भूमिगत गटारींना चेंबर केले नाहीत, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी लागणारे आरओ प्लांट करिता बिले काढण्यात आली मात्र प्रत्यक्षात याठिकाणी कोणतेही आरओ प्लांट आढळून आले नाही. या पाहणीत अनेक कामे अपूर्ण तर अनेक कामे न करताच बिले काढण्यात आल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

महिलांनी व्यक्त केला रोष
तपासणी अधिकारी गावात आल्यानंतर निकृष्ट कामांची पाहणी करण्यात आली. या वेळी इंदिरानगर भागातील महिलांनी रोष व्यक्त करीत आमच्या वसाहतीमधील कामे न करता पैसे काढणाऱ्यांना शिक्षा व्हावी असा नारा दिला.

दोषींवर गुन्हे दाखल करावेत
चौकशीत घोळ किती मोठा आहे हे प्रत्यक्षात अधिकाऱ्यांनाही लक्षात आले आहे. सदर कामांची लवकरात लवकर चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. या प्रकरणात पंचायत समितीच्या अभियंत्यांनादेखील जबाबदार धरण्यात यावे, तरच ग्रामस्थांना न्याय मिळेल. संबंधित ग्रामसेवक राठोड मुद्दाम हजर होत नाहीत.अनिल महाले, तक्रारदार बेटावद

कामे आढळली निकृष्ट
बेटावद येथील अनेक कामे निकृष्ट आढळून आली. सर्व कामांच्या चौकशीसाठी व बिले काढण्यात आलेल्या कामांसंबंधित माहितीसाठी ग्रामसेवक एस. एम. राठोड हे असणे गरजेचे आहे. मात्र ग्रामसेवक रजेवर गेले आहेत त्यांच्याशी संपर्क होत नाही.
-आर.एस. देसले, शाखा अभियंता पाणीपुरवठा विभाग

बातम्या आणखी आहेत...