आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य:कुपोषण मुक्तीसाठी स्तनदा, गरोदर मातांसह बालकांना पोषक आहार

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण आणि आदिवासी भागातील कुपोषण निर्मूलनासाठी महिला आणि बालविकास विभागातर्फे गरोदर, स्तनदा मातांसह ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील बालकांच्या भरण पोषणावर भर देण्यात आला आहे. कोरोनाचे संकट टळल्यानंतर अंगणवाडीला सुटी न देता १६ मेपासून अंगणवाडी सुरू ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील सहा प्रकल्पांत अमृत आहार योजनेतून पोषकमूल्य असलेला आहार दिला जातो आहे. तसेच अंगणवाडीत शिजवलेल्या आहाराचे वितरण करण्यात येत असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण अधिकारी हेमंत भदाणे यांनी दिली.

महिला आणि बालकल्याण विभागांतर्गत कुपोषण निर्मूलनासाठी व्यापक मोहीम राबवण्यात येत आहे. कोरोनाच्या कालावधीत झालेले नुकसान भरून काढण्यासाठी योग्य पोषण आहार मिळावा यावर विशेष लक्ष देण्यात येते आहे. जिल्ह्यात १५ एप्रिल २०२१ पासून घरपोच अन्न देण्यात येते आहे. त्यात ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील ७३ हजार ८१० बालकांना गहू, मूगडाळ, मिरची, हळद, मीठ, चवळी, साखर प्रत्येकी पन्नास ग्रॅम, ३० हजार १२१ गरोदर आणि स्तनदा मातांना गहू, मूगडाळ, मिरची, हळद, मीठ, चवळी, साखर प्रत्येकी पन्नास ग्रॅम तसेच ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील तीन हजार ४१० तीव्र कमी वजनाच्या बालकांसाठी अतिरिक्त पोषण आहार म्हणून गहू, मूगडाळ, मिरची, हळद, मीठ, चवळी, साखर प्रत्येकी पन्नास ग्रॅम देण्यात आले. कोरोनामुळे दोन वर्षे सलग अंगणवाड्या बंद होत्या.

त्यामुळे अंगणवाड्यांच्या उन्हाळी सुट्या कमी करण्यात आल्या. अंगणवाड्या १६ मे पासून सुरू आहे. सध्या जिल्ह्यातील सर्व अंगणवाडीत शिजवलेला पोषण आहार दिला जातो आहे. त्यात १ हजार ६७० अंगणवाडीत कोविडपूर्वी ज्या बचत गटांना काम देण्यात आले होते, त्यांच्या माध्यमातून पोषण आहार शिजवण्यात येतो आहे. तसेच ३२० अंगणवाडी केंद्रांमध्ये पोषण आहार शिजवण्यासाठी नव्याने ४१ बचत गटांची नियुक्ती करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त १२९ अंगणवाडींना थेट फेडरेशनकडून धान्य पुरवठा करून पोषण आहार शिजवण्यात येतो आहे. जिल्ह्यातील सर्वच अंगणवाडी केंद्रात पूरक पोषण मूल्य असलेला पोषण आहार शिजवण्यात येतो आहे.

१९७ गावांत १५८ अंगणवाडीत आहार
जिल्ह्यात आदिवासी क्षेत्रातील पाच प्रकल्पांमध्ये अमृत आहार योजना लागू आहे. त्यात शिरपूर एक व दोन, साक्री, दहिवेल आणि पिंपळनेर या प्रकल्पांचा समावेश आहे. या पाचही प्रकल्पातील १९७ गावांमधील १५८ अंगणवाडी केंद्रात अमृत आहार योजना लागू आहे. त्यात ६ हजार ५७० गरोदर माता, ५ हजार ४१७ स्तनदा मातांना शिजवलेला पोषण आहार देण्यात येतो आहे. टप्पा दोन मध्ये ७ महिने ते ६ वर्षे वयोगटातील ६४ हजार ५०८ बालकांना आठवड्यातून चार दिवस अंडी किंवा केळी देण्यात येतात. अंडी किंवा केळी खरेदीचा अधिकार आहार समितीला देण्यात आला आहे.

अंगणवाडीत असा दिला जातो आहार
सोमवार : मुरमुरा लाडू, वरण भात.
मंगळवार : गूळ शेंगदाणा चिक्की व तांदळाची खिचडी.
बुधवार : राजगिरा चिक्की व मटकी उसळ.
गुरुवार : मुरमुरा लाडू आणि गव्हाची लापसी.
शुक्रवार : नाचणी लाडू आणि व्हेज पुलाव
शनिवार : राजगिरा चिक्की आणि उपमा

बातम्या आणखी आहेत...