आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंगल फेज लाइनचे लोकार्पण:दुर्गम भागामधील प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचवा, उपकेंद्राचा प्रस्ताव द्या; विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावितांची सूचना

धुळे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साक्री तालुक्यात दुर्गम भागातील प्रत्येक घरापर्यंत वीजपुरवठा करण्याचे नियोजन करावे. नवीन वीज उपकेंद्रासाठी प्रस्ताव सादर करावे, अशी सूचना आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केली.साक्री तालुक्यातील उमरपाटा येथे ३३/११ केव्हीच्या सिंगल फेज लाइनचे लोकार्पण झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी खासदार डॉ. हीना गावित, आमदार मंजुळा गावित, सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी तृप्ती धोडमिसे, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता म्हस्के, जिल्हा परिषद सदस्य छगन राऊत, धीरज अहिरे, उमरपाटाचे सरपंच राजेंद्र देसाई आदी उपस्थित होते.

मंत्री डॉ. विजयकुमार गावित म्हणाले की, दुर्गम भागातील प्रत्येक घराचे सर्वेक्षण करून वीज जोडणी द्यावी. त्यासाठी आवश्यक साधन सामग्रीचा प्रस्ताव सादर करावा. वीज वितरण कंपनीच्या १३२ केव्ही केंद्रासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. प्रत्येक गावातील प्रत्येक घरापर्यंत नळाने पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मर कार्यान्वित करावे. तसेच आवश्यक तेथे जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित करावे. बारमाही आणि पुरेसे पाणी उपलब्ध होईल, असे नियोजन करण्यात येते आहे.

ठक्करबाप्पा योजनेंतर्गत लोकसंख्येनुसार एक कोटी ते दहा लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. याबाबत नियोजन सुरू असून, लवकरच निर्णय घेण्यात येईल. बसरावळ, खैरखुटा सिंचन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देऊ. कृषी पंपाचा निर्णय लवकर घेण्यात येईल. येत्या दोन वर्षांत वीज, पाणीप्रश्न सोडवण्यात येतील, असेही मंत्री डॉ. गावित म्हणाले.

पिंपळनेर येथील वीज कंेद्रासाठी प्रस्ताव
आमदार मंजुळा गावित म्हणाल्या की, सिंगल फेसिंग योजनेमुळे विजेच्या समस्या मार्गी लागतील. पिंपळनेर येथे १३२ केव्हीचे वीज केंद्र व्हावे यासाठी प्रस्ताव दिला आहे. त्यासाठी आदिवासी विकास विभागाने निधी द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. माजी आमदार डी. एस. अहिरे, जिल्हा परिषद सदस्य राऊत, डॉ. तुळशीराम गावित यांनी मनोगत व्यक्त केले.

आठ तास वीजपुरवठा
खासदार डॉ. गावित म्हणाल्या की, साक्री तालुक्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय विद्युतीकरण योजनेत उमरपाटा आणि ब्राह्मणवेलचा समावेश झाला आहे. या उपकेंद्रांमुळे चोवीस तास विजेची सुविधा मिळणार आहे. शेतकऱ्यांना सलग आठ तास वीज पुरवठा होईल. परिसरातील धरण, लघु प्रकल्पांसाठी निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यामुळे सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत होईल. परिसरातील उपसा सिंचन योजनेसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. या भागातील आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील.

बातम्या आणखी आहेत...