आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:अनुसूचित जमातीच्या १५ हजार विद्यार्थ्यांना जातीचे दाखले

धुळे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या धुळे प्रकल्प कार्यालयातर्फे शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील १५ हजार ८७५ विद्यार्थ्यांना जातीच्या दाखल्याचे वितरण करण्यात आले. सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमामुळे गैरसोय टळली.

अनुसूचित जमातीतील विद्यार्थी व त्यांच्या पालकांची जातीच्या दाखल्यांसाठी धावपळ होऊ नये यासाठी १५ जुलैपासून हा उपक्रम राबवण्यास सुरुवात झाली. धुळे प्रकल्पांतर्गत २२ शासकीय व ३४ अनुदानित आश्रमशाळेत दुसरी ते नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना एक ऑगस्ट म्हणजेच महसूलदिनी जात व अधिवास प्रमाणपत्र देण्याचे नियोजन उपविभागीय अधिकारी कार्यालय व प्रकल्प कार्यालयाने केले होते. प्रकल्प कार्यालयातर्फे न्युक्लिअस बजेट योजना व शिक्षण विभागाच्या मदतीने हा उपक्रम राबवण्यात आला.

त्यासाठी २० जुलैपर्यंत सर्व ५६ शाळेतील विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांचे संकलन करण्यात आले. ही कागदपत्रे महा- ई सेवा केंद्राच्या संचालकांकडे देण्यात आली. त्यानंतर २१ ते २६ जुलै या कालावधीत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तसेच २७ ते २७ जुलैदरम्यान उपविभागीय व तहसील कार्यालय स्तरावरून प्रमाणपत्रे निर्गमित करण्यात आली. त्यानंतर पुन्हा महा- ई सेवा केंद्र आणि शाळांकडे ही प्रमाणपत्रे देण्यात आली. त्यानुसार १५ हजार ८७५ जात प्रमाणपत्र व १४ हजार ३५२ अधिवास प्रमाणपत्र देण्यात आली. प्रमाणपत्रांचे वितरण आदिवासी दिनापर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. शाळेतच दाखले मिळाल्याने विद्यार्थी व पालकांची होणारी गैरसोय टळण्यास मदत झाली.

बातम्या आणखी आहेत...