आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात एकीकडे तापमानाचा पारा वाढत असताना दुसरीकडे जलस्रोतांमधील पाणीसाठा कमी होतो आहे. त्यामुळे टंचाईच्या झळा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ११ गावांमध्ये टंचाई निवारणासाठी विहीर अधिग्रहणाचा आधार घ्यावा लागला आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे मार्च महिन्यापर्यंत एकाही गावात टंचाई जाणवली नाही. अद्यापही लघू, मध्यम प्रकल्पात बऱ्यापैकी जलसाठा आहे. तसेच गाव तलावांमध्ये पाणीसाठा आहे. पण काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढत असल्याने पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढतो आहे. जिल्ह्यातील ११ गावांना पाणीपुरवठा करणारे मूळ जलस्रोत आटल्याने या गावांमध्ये विहीर अधिग्रहण करावे लागले. त्यात शिंदखेडा तालुक्यातील चुडाणे, रुदाणे, खर्दे बु., कर्ले, जोगशेलू, मांडळ, साक्री तालुक्यातील विसरडी, कोरडे, कालटेक, पचाळे, शेणपूर या गावांचा समावेश आहे. अद्याप एकाही गावात टँकर सुरू नाही. आगामी काळात काही गावांमध्ये टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करणे आवश्यक आहे. जलवाहिनींना लागलेली गळती थांबवण्याची गरज आहे.
चार जलस्रोत अशुद्ध असल्याचा अहवाल
जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या जलस्रोतातील पाण्याची तपासणी झाली. त्यानुसार ४३४ नमुने तपासले. साक्री तालुक्यातील कासारे, शेणपूर येथील प्रत्येकी एक तर गव्हाणीपाडा येथील दोन जलस्रोतांचे नमुने अशुद्ध आढळले. त्यामुळे तिन्ही ग्रामपंचायतींना आरोग्य विभागाने जलस्रोतांची स्वच्छता करण्याचे आदेश दिले. दरम्यान, टीसीएल पावडरच्या १६४ नमुन्यांची तपासणी झाली. साक्री तालुक्यात १ आणि शिंदखेडा तालुक्यात ६ अशा ७ नमुन्यांत क्लोरिनचे प्रमाण कमी आढळले. या ग्रामपंचायतींना नोटीस देण्यात आली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.