आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:धुळेकरांच्या संयमाची परीक्षा उद्यापासून, स्वयंशिस्त पाळा; अनलॉकबाबत जिल्हाधिकारी आज आदेश काढणार

धुळे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बेपर्वाई : अनलॉक पूर्वीच बाजारात खरेदीसाठी गर्दी करणे योग्य नव्हे

शासनाने स्थानिक परिस्थितीनुसार अनलॉकचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार साेमवारपासून शहरातील सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरळीत सुरू होतील. तसे आदेश उद्या रविवारी निघण्याची शक्यता आहे. त्यातून बाजारपेठेत गर्दी वाढेल. दुसरीकडे तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आता स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. कारण पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत अधिक गंभीर होती. पुन्हा तशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नियमांचे पालन होणे आवश्यक आहे.

दुसऱ्या लाटेत २६ हजार बाधित अन् २७३ मृत्यू
दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात मार्च ते मे तीन महिन्यांत २६ हजार २४८ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. तसेच २७३ जणांचा मृत्यू झाला. शहरात शनिवारपर्यंत २५६ सक्रिय रुग्ण आहे. तसेच जिल्ह्यात ५२३ रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी मास्कचा वापर करणे, फिजिकल डिस्टन्स पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे या त्रिसूत्रीचा अवलंब कायम ठेवणे आवश्यक आहे. तसेच लस घेणे आवश्यक आहे.

पहिल्या लाटेत १५ हजार बाधित
जिल्ह्यात काेराेनाच्या पहिल्या लाटेत जुलै ते सप्टेंबर दरम्यान ११ हजार ५५१ कोरोनाबाधित अाढळले हाेेते. तसेच २९६ बाधितांचा मृत्यू झाला हाेता. तसेच शहरात ५ हजार १५४ बाधित अाढळले हाेते. त्यातून १२९ बाधितांचा मृत्यू झाला हाेता.कोरोना बाधितांची संख्या आता घटली आहे. शहरात शनिवारी दिवसभरात केवळ चार बाधित आढळले. दुसरीकडे शहरातील आग्रारोड परिसरात दोन दिवसांपासून गर्दी वाढली आहे. त्यामुळे या भागात किंवा अन्यत्र अशीच गर्दी होत राहिल्यास पुन्हा काेरोनाचा धोका वाढू शकतो हे लक्षात घ्या.

आज चित्र स्पष्ट होणार
अनलॉकविषयी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची सूचना आहे. त्यानुसार उद्या रविवारी जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील निर्बंधाबाबत निर्देश जाहीर होतील, अशी माहिती देण्यात आली. त्यामुळे उद्याच अनलॉकचे चित्र स्पष्ट होईल.

४२ हजार बाधित, ४१ हजार कोरोनामुक्त
जिल्ह्यात आत्तापर्यंत ४२ हजार २४४ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ४१ हजार ५६ नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच ६६५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात धुळे शहरातील २५९ तर ग्रामीण भागातील ४०६ मृतांचा समावेश आहे. शहरात आत्तापर्यंत १८ हजार ८६ बाधित आढळले असून १७ हजार ५७१ कोरोनामुक्त झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...