आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कायवॉक होणार सहा महिन्यात:विद्यार्थ्यांना दिलासा कमलाबाई शाळेजवळील चौकात उभारणी;  ७७ लाखांचा खर्च

धुळे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील कमलाबाई कन्या शाळेजवळील चौकात शाळा सुटण्यासह भरण्याच्या वेळेत वाहतूक कोंडी होते. विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी स्कायवॉक उभारला जाणार आहे. हा स्कायवॉक जमिनीपासून ७ मीटर उंच असेल. हे काम सहा महिन्यात पूर्ण होईल. त्यावर ७७ लाख रूपये खर्च होतील.

शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. शाळा सुटण्याच्या वेळेत संतोषी माता चौक, कमलाबाई कन्या शाळेजवळील चौक, गिंदोडीया चौक, पारोळा रोड चौफुली या ठिकाणी गर्दी असते. त्यातही कमलाबाई कन्या शाळेजवळ सर्वाधिक वाहतूक कोंडी होते. त्यामुळे हा चौक वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे. चौकातील सिग्नलही अनेकवेळा बंद असतात. वाहतूक पोलिस नियुक्त असले तरी अपघात होण्याची शक्यता असते. काही वेेळा वाहतूक पोलिसांचीही वाहतूक सुरळीत करताना कसरत होते. ही बाब लक्षात घेऊन आमदार फारुक शाह यांच्या निधीतून या चौकात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्कायवॉक उभारण्यात येणार आहे. स्कायवॉक जमिनीपासून ७ मीटर उंच असल्याने त्या खालून मोठी वाहन सहज जाऊ शकतील. स्काय वॉक लोखंडी असेल.

असा असेल स्कायवॉक, आमदारांच्या हस्ते भूमिपूजन
स्कायवॉकसाठी बाफना हायस्कूल प्रवेशद्वाराजळून जीना असेल. जिल्हा रुग्णालय भिंतीच्या अलीकडेपर्यंत तो असेल. त्यानंतर रस्त्यावरुन पलीकडे कमलाबाई शाळेच्या भिंतीपर्यंत स्कायवॉक असेल. तेथून पुढे रस्त्याला लागून सिग्नलजवळ कमलाबाई शाळेच्या भिंतीलगत खाली उतरण्यासाठी जीना असेल. स्थानिक विकास निधीतून होणाऱ्या या कामाचे सोमवारी आमदार शाह यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. या वेळी कमलाबाई शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा भिसे-जोशी, मुख्याध्यापिका कल्पना मोरे, साधना मानेकर, आशा निकुंभ आदी उपस्थित होते.

सात फूट असेल रुंदी
स्कायवॉकवर जाण्यासाठी करण्यात येणारा जिना व स्कायवॉकची रुंदी सात फूट असेल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्कायवॉकला दोन्ही बाजूला कठडे व त्यांना जाळी बसवण्यात येणार आहे. पाऊस व उन्हापासून संरक्षणासाठी स्कायवॉकवर पत्र्याचे शेड उभारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

वीजवाहिन्या होणार भूमिगत
कमलाबाई कन्या शाळेच्या चौकात उच्च दाबाच्या वीज वाहिन्या आहे. या वीज वाहिन्या भूमिगत करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आमदार फारूक शाह यांनी १९ लाख रूपये मंजूर करून घेतले आहे. हे कामही लवकरच सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...