आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फावले:कथित सावकार राजेंद्र बंब याला कोरोना योद्धा; पर्यायी आर्थिक संस्थाच नेस्तनाबूत केल्याने अशा अगड-बंबांचे फावले

धूळे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कथित सावकार राजेंद्र बंब याला कोरोना योद्धा म्हणून थेट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गौरवले. त्याचे मोठमोठे बॅनर आणि होर्डिंग धुळे शहरात लावले गेले. असे काय काम या माणसाने कोरोना काळात केले होते? हा प्रश्न खरे तर तेव्हाच उपस्थित केला जायला हवा होता; पण तो कोणी केला नाही. अगदी माध्यमांनीही नाही.(‘दिव्य मराठी’ही त्यात आहे आणि त्याबद्दल खेद वाटतो आहे.) पण आता फुगा फुटलाच आहे तर त्याचीही चौकशी व्हायला हवी. किमान त्याचे सोशल आॅडिट तरी व्हायला हवे. आता जी माहिती समोर येते आहे ती तर धक्कादायक आहे. कोरोना काळात या माणसाने ‘काेरोना योद्धा’ असे लिहिलेले ओळखपत्र आपल्या माणसांसाठी तयार करवून घेतले होते आणि त्याचा गैरफायदा घेत ही माणसे त्या लाॅकडाऊनच्या काळातही कर्ज आणि व्याज वसुलीचे काम करीत होती, असे म्हणतात. ज्यांनी ही कामे केलीत त्यांच्यातल्याच एकाने ही माहिती दिली आहे.

आता प्रश्न असा आहे की, या माणसाला कोरोना योद्धा म्हणून गौरवले जावे, अशी शिफारस राज्यपालांकडे कोणी केली होती? कोण्या प्रतिष्ठित व्यक्तीने, पदाधिकाऱ्याने शिफारस केल्याशिवाय तर राजभवनाची व्यवस्था कोणाचा असा सन्मान करणार नाही हे नक्की. मिळणारी माहिती अशी आहे की, भाजपच्याच एका प्रतिष्ठित पदाधिकाऱ्याच्या ई-मेलने ही शिफारस केली गेली होती. त्या पदाधिकाऱ्याला याची कल्पना तरी होती की नाही, हाही प्रश्नच आहे. म्हणूनच या निमित्ताने नेमके कोणी, कोणाच्या माध्यमातून हे घडवून आणले हे समोर यायला हवे. जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तींचे ई-मेल अशा कामांसाठी वापरले जात असतील तर मोठीच शोकांतिका आहे.

जी.पी. फायनान्स या नावाने या माणसाने पैशांसाठी अडलेल्या, हतबल झालेल्या व्यक्तींची जी काही पिळवणूक केली ती केवळ धिक्कारार्हच आहे. प्रश्न आहे तो या प्रवृत्तीच्या माणसांना अशी संधीच कशी मिळते, हा. आपली फसवणूक होते आहे, पिळवणूक होते आहे, आपल्या हतबलतेचा अती गैरफायदा घेतला जातो आहे हे या कथित सावकाराच्या कर्जाच्या फासात अडकणाऱ्यांना कळत नव्हते का? हा अन्याय आहे आणि त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे, असे त्यांच्यापैकी कोणालाही इतकी वर्षे का वाटले नाही? ‘पर्याय नव्हता’ हे आणि हेच एकमेव उत्तर या प्रश्नांनंतर येणार आहे हे उघड आहे.

कोणताही अन्य कमी हानिकारक, कमी अपमानास्पद पर्याय उपलब्ध असता तर पैशांसाठी हतबल झालेल्या धुळेकरांनी तो स्वीकारला नसता, असे कसे म्हणता येईल? कशाचेही सोंग करता येते; पण पैशांचे सोंग घेता येत नाही असे म्हणतात ते काही खोटे नाही. धुळ्यातील लहान व्यावसायिक, व्यापारी, शेतकरी, कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेले, रोजगार गमावलेले नागरिक यांना अन्य कोणताही पर्याय दिसत नसल्याने ते या फासात अडकले याची खंत धुळ्याचे नेतृत्व करण्याच्या गप्पा मारणाऱ्या एका तरी नेत्याला वाटते आहे का?

पर्यायी व्यवस्थाच केल्या गेल्या नेस्तनाबूत
एक काळ असा होता की, धुळे हे सहकारी पतसंस्थांचे आगार वाटत होते. गल्लोगल्ली सहकारी पतसंस्थांचे अक्षरश: पेव फुटले होते. प्रत्येक जातीच्या, धर्माच्या पतसंस्था अस्तित्वात येत होत्या. त्यांची कार्यालये थाटली जात होती. ठेवीदारांना एकापेक्षा एक सरस व्याजदर देऊन ठेवींसाठी आकर्षित केले जात होते. आलेल्या ठेवींमधून कर्ज वाटप केले जात होते. थोडीफार ओळख असलेल्या व्यक्तीला अडचणीच्या वेळी, संकटकाळी क्षणार्धात पैसा उपलब्ध करून दिला जात होता. पण तिथेही तेच घडले जे या कथित सावकाराने केले. या सहकारी पतसंस्था ज्यांच्या ताब्यात होत्या त्यांनी मनमानी करीत पैशांचा गैरवापर केला.

स्वत:ची घरे भरून घेतली आणि विश्वासाने ठेवी ठेवणाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. लोकांनी आयुष्याची कमाई व्याजाच्या थोड्या अधिक लाभाच्या मोहात या पतसंस्थाचालकांच्या हाती सोपवली होती ती त्यांनी विश्वासघाताने लुबाडली. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. कन्हैयालाल पतसंस्था, समर्थ पतपेढी या आणि अशा अनेक पतसंस्था सर्वसामान्य धुळेकरांना बुडवून स्वत:ही बुडाल्या. त्यात ठेवी ठेवणाऱ्यांची तर हानी झालीच; पण ज्यांना या संस्थांच्या माध्यमातून सहज पैसा उपलब्ध होऊन जात होता आणि गरज भागवली जात होती त्यांचाही तो मार्ग बंद झाला.

इंदिरा सहकारी बँक, धुळे मर्चंट‌्स को-आॅपरेटिव्ह बँक, राजवाडे सहकारी बँक, राजलक्ष्मी सहकारी बँक, दादासाहेब रावळ सहकारी बँक अशा एकेक करीत अनेक सहकारी बँकाही इतिहास जमा झाल्या आहेत. त्यामुळे गरजेच्या वेळी न्याय्य पद्धतीने कर्जपुरवठा करणारी व्यवस्थाच धुळ्यात पुरेशा प्रमाणात राहिली नाही. ज्या पतसंस्था आणि सहकारी बँका आज अस्तित्वात आहेत, त्यांच्यापैकी अनेक बाहेरच्या आहेत किंवा अन्य संस्था बुडाल्यामुळे त्या अती सावध झालेल्या आहेत. त्याचा परिणाम पतपुरवठा होण्यातील सहजताच संपली आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य गरजवंत अशा कथित सावकारांच्या जाळ्यात सहज जाऊन अडकला नसता तरच आश्चर्य होते.

व्याज, मुद्दल वसुली हा व्यवसायच
धुळे हे खरे तर पहिलवानांचे गाव म्हणून ओळखले जाते; पण या पहिलवानकीने आता आपला चेहरा आणि त्यामुळे ओळखही बदलवून टाकली आहे. व्याजाचे आणि मुद्दलाचे पैसे वसूल करून देण्याचा व्यवसायच आपल्या ताकदीच्या बळावर ही पहिलवान मंडळी करू लागली आहेत. त्यामुळे ज्या प्रमाणात अवैध सावकारांकडून व्याज धुळ्यात आकारले जाते तितके ते क्वचितच इतरत्र आकारले जात असावे. असे दोन-चार पहिलवान पदरी बाळगले की व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करणाऱ्यांना पैसे वसुलीची चिंता राहत नाही.

हतबल असलेला गरजवंत मग त्याला बळी पडतो आणि त्यातून असे अगड-बंब धनदांडगे तयार होतात. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाचे जाळे असलेले धुळ्यासारखे शहर दुसरे नसावे. दळणवळणाची इतकी चांगली सुविधा असतानाही इथल्या नेतृत्वाच्या दौर्बल्यामुळे इथे उद्योग विकसित झालेच नाहीत. उद्योग नाहीत म्हणून रोजगार नाही आणि रोजगार नाही म्हणून मग अवैध धंद्यांचे आणि अवैध सावकारांचेही पीक आलेले अशी या शहराची शोकांतिका आहे.

इथल्या काही नेत्यांनी सहकारी क्षेत्रात उद्योग उभारणीचा प्रयत्न काही प्रमाणात केला होता खरा; पण तिथेही तेच ‘गोतास काळ’ बनले. ना सूतगिरणी, ना स्टार्च फॅक्टरी, ना दूध डेअरी आणि ना तेलबिया प्रक्रिया उद्योग आज शिल्लक आहे. कसे चालेल इथले अर्थकारण? ज्यांना या परिस्थितीचा गैरफायदा कसा घ्यायचा याची मेख कळाली ते वृत्तपत्र विक्रेत्यासारख्या सामान्य व्यवसायातील माणसेही मग गळेकापू सावकारीत गब्बर होत गेलीत. कोणाला दोष द्यायचा या परिस्थितीसाठी? धुळेकरांनो, तुम्हीच ठरवा. (ज्यांची फसवणूक झाली त्यांना न्याय कसा मिळेल? वाचा उद्याच्या अंकात)

बातम्या आणखी आहेत...