आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव:केदारनाथचे घडणार दर्शन, देशातील 75 वर्षांच्या प्रगतीवरही प्रकाशझोत

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे दोन वर्ष साध्या पध्दतीने गणेशोत्सव झाला. यंदा कोणतेही निर्बंध नाही. त्यामुळे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आकर्षक रोषणाई केली आहे. तसेच काही मंडळांनी सामाजिक प्रबोधनावर सजीव देखावे साकारले आहेत. यंदा धुळेकरांना केदारनाथचे दर्शनही शहरात घडणार आहे. तसेच देशाच्या ७५ वर्षांच्या प्रगतीवर सजीव देखाव्यातून प्रकाश टाकला जाणार आहे. गणेश मंडळांनी आरास खुल्या करण्यास प्राधान्य दिले आहे. पण दोन दिवसांपासून पाऊस होत असल्याने अडचणी वाढल्या आहेत.

यंदा गणेशोत्सव उत्साहात साजरा होतो आहे. शहरातील चौकाचौकात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे चौक उजळून निघाले आहे. बहुतांश मंडळांनी यंदा मोठ्या मूर्तींची स्थापना करण्यावर भर दिला आहे. तसेच सजीव देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करण्याचे नियोजन केले आहे. काही मंडळांची आरास शुक्रवारपासून खुली झाली आहे. काही मंडळांची आरास शनिवार व रविवारपासून खुली करण्याचे नियोजन केले आहे. दोन्ही दिवशी गर्दी होईल.

वर्गणी न घेता गणेशोत्सव
शहरातील गल्ली क्रमांक ४ मधील जय भोले ग्रुपतर्फे केदारनाथ मंदिराचा देखावा तयार करण्यात आला आहे. मंडळाचे अध्यक्ष उदय चौरसिया आणि ४० सहकाऱ्यांनी कोणाकडूनही देणगी किंवा वर्गणी न घेता स्व खर्चातून गणेशमूर्तीची स्थापना व देखावा उभारला आहे. मंडळाने केदारनाथ मंदिराची प्रतिकृती उभारली असून, या ठिकाणी भगवान शंकराची मूर्ती दर्शनासाठी ठेवली आहे. तसेच कोलकाताहून लाइटिंग आणली आहे.

राणा प्रताप मंडळाचा सजीव देखाव्यातून प्रबोधनाचा प्रयत्न
शहरातील गल्ली क्रमांक सहामधील श्री राणा प्रताप गणेश मंडळातर्फे सजीव आरास करण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावर आधारित देखावा मंडळाने यंदा केला आहे. गेल्या ७५ वर्षात देशाची प्रगती कशी झाली याचा आलेख या देखाव्यातून मांडण्यात आला आहे. माजी नगरसेवक अनिल मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली मंडळाने ही आरास साकारून वेगळेपण जपण्याचा प्रयत्न यंदाही केला आहे.

बातम्या आणखी आहेत...