आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झगमगाट:देवपूर परिसर दोन हजार एलईडी पथदिव्यांच्या प्रकाशाने उजळणार; 14 हजार पथदिवे बसवल्याचा दावा

धुळे10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेतर्फे शहरातील सर्व भागात एलईडी पथदिवे लावण्याचे काम सुरू झाले आहे. या कामाचा महापालिकेने ठेका दिला आहे. सहा महिने पथदिवे लावण्याचे काम बंद होते. ते आता पुन्हा सुरू झाले आहे. आत्तापर्यंत १४ हजारावर एलईडी पथदिवे लावण्यात आले आहे. तसेच देवपूर भागात २ हजारावर एलईडी लावण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

महापालिकेला वीजबिलावर दरमहा लाखो रूपये खर्च करावे लागतात. त्यामुळे पथदिव्यांचे वीजबिल कमी व्हावे या उद्देशाने महापालिकेने शहरातील सर्व भागात एलईडी पथदिवे लावण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाचेही एलईडी पथदिवे लावण्याचे धोरण आहे. पथदिवे लावण्याचा ठेका महापालिकेने गुजरातमधील वल्लभ इलेक्ट्रीकल्सला दिला आहे. शहरातील पूर्वीचे पथदिवे काढून तेथे एलईडी पथदिवे बसवण्यात येता आहे. शहरात साधारणपणे १८ हजार पथदिवे बसवण्यात येणार आहे. महापालिकेच्या हद्दीत आलेल्या गावांमध्येही पथदिवे लावण्यात येतील. त्यानूसार आत्तापर्यंत १४ हजार ५०० पथदिवे बसवण्यात अाले आहे. अद्याप वलवाडी व देवपूर परिसरातील वसाहतीत एलईडी बसवण्याचे काम अपूर्ण आहे.

बिल न मिळाल्याने ठेकेदाराने काम बंद केले होते. पथदिवे बसवण्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. देवपूर भागात गणेशोत्सवापूर्वी सप्टेबर महिन्यापर्यत २ हजार २०० पथदिवे लावण्याचे नियोजन आहे. त्याचप्रमाणे पेठ भाग व इतर ठिकाणी साधारणपणे २ हजार पथदिवे लावण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. एलईडी पथदिवे बसवण्याचे काम वेगात व वेळेत पूर्ण करावे, अशी अपेक्षा व्यकत होते आहे.

पांझरा काठावरील रस्त्यावर अंधार
शहरातील पांझरा नदीच्या काठावर बांधण्यात आलेल्या रस्त्यावरील पथदिवे बंद आहे. त्यामुळे या रस्त्यावर अंधार असतो. या रस्त्यावर एकविरा देवी मंदीर ते हत्तीडोहापर्यंत दोन्ही बाजूचे पथदिवे अनेक महिन्यापासून बंद आहे. त्यांची दुरूस्ती करण्यात अालेली नाही. या रस्त्यावर माेकाट कुत्रेही बसलेले असतात. तसेच नदी काठावरील भिंतीवर काही जणांकडून मद्यमान केले जाते. त्यामुळे या रस्त्यावरील पथदिवे तातडीने सुरू करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

रोज ७० ते ८० पथदिव्यांची दुरुस्ती
शहरातील काही भागात पूर्वीचे पथदिवे आहे. ते बंद पडत असल्याने पथदिवे दुरूस्तीचे कामही नेहमी सुरू असते. रोज दिवसभरात सुमारे ७० ते ८० पथदिव्यांची दुरूस्ती केली जाते अशी माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली.

वीजपुरवठा खंडितमुळे पथदिवे बंद
शहरात गेल्या काही दिवसापासून विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. सायंकाळनंतरही पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेक भागातील पथदिवे रात्री बंद असतात. ऐन पावसाळ्यात ही समस्या निर्माण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...