आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मनवाणी येथे ढोल, बँडच्या तालावर पोळा साजरा; मुलांनी प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमानाची साकारली वेशभूषा

अक्कलकुवा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धडगाव तालुक्यातील मनवाणी येथे पोळा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी सातपुड्यातून आलेल्या हजारोंच्या संख्येतील नागरिकांनी बैलपोळ्या निमित्ताने पारंपरिक ढोल व बँडच्या तालावर बेधुंद होत नाचण्याचा मनसोक्त आनंद घेतला.

धडगाव तालुक्यातील मनवाणी येथे बैलपोळा सणाचे सातपुड्यात मोठे आकर्षण आहे. दरवर्षी मोठ्या जल्लोषात पारंपरिक पद्धतीने उत्साहात पोळा साजरा केला जातो. या वेळी जिल्हा परिषद मराठी शाळेपासून सजवलेल्या बैलांची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये लहान चिमुकल्यानी प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांची वेशभूषा करीत मिरवणुकीत सहभाग घेतला. मिरवणुकीत सजवलेल्या बैलांची हनुमान मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घालून पुजारी काकड्या महाराज यांच्या हस्ते बैलांची व शेतकऱ्यांची पूजा करण्यात आली.

याप्रसंगी पारंपरिक ढोल व बँडच्या तालावर सातपुड्याच्या गाव पाड्यांवरून आलेल्या हजारोंच्या संख्येतील नागरिकांनी मनसोक्त नाचण्याच्या आनंद घेतला. सकाळपासूनच पोळा सणासाठी गावातील हनुमान मंदिर परिसरात दर्शन व पूजाविधीसाठी परिसरातून मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती. तसेच येथील पोळा सण सातपुड्याच्या कुशीतील मोठा सण असतो. त्यामुळे या सणाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी सातपुड्याच्या गाव पाड्यांवरून मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. या वेळी असली (ता. धडगाव) येथील रहिवासी व आंतरराष्ट्रीय धावपटू भगतसिंग वळवी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजाचे व नंदुरबार जिल्ह्याचे नाव उंचावले म्हणून भगतसिंग वळवी यांचा शाल श्रीफळ व बक्षीस देऊन मनवाणी गावाचे नागरिक पदाधिकारी यांच्याकडून सत्कार करण्यात आला. या वेळी गावातील ज्येष्ठ पदाधिकारी, बैलपोळा समितीचे पदाधिकारी, नागरिक व पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

बातम्या आणखी आहेत...