आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लपवाछपवी उघड:प्रशासन म्हणते 18 दिवसांत 77 मृत्यू; दहनभूमीत प्रत्यक्षात 163 मृतांवर अंत्यसंस्कार

धुळे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सावळा गोंधळ घोषित आकडेवारीपेक्षा संख्या तिप्पट; 4 ते 22 एप्रिलपर्यंतचे वास्तव

कोरोनाच्या विस्फाेटानंतर बाधितच नव्हे मृतांची संख्याही झपाट्याने वाढते आहे. प्रशासनातर्फे जाहीर करण्यात येणाऱ्या मृतांच्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्षात मृतांची संख्या तिपटीच्याही पुढे आहे. प्रशासकीय आकडेवारी, अंत्यविधीनंतर होणाऱ्या नांेदी व रजिस्टरवरील नोंद बघितली तर ४ ते २२ एप्रिलदरम्यान तब्बल २६३ जणांचा मृत्यू झाला आहे. पण प्रशासकीय आकडेवारी केवळ ७७ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगते. शिवाय मृतांची संख्या रोज किमान दहापर्यंत असल्याचे स्पष्ट झाले. त्यातून मृतांचा आकडा लपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होतो आहे.

कोरोनाचे मृत्यूचक्र अजूनही सुरूच आहे. प्रशासन त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील असताना सांगितल्या जाणाऱ्या आकडेवारीमुळे संभ्रम निर्माण होतो आहे. त्यामुळे तथ्य जाणून घेण्यासाठी दिव्य मराठीने खोलात जाऊन माहिती घेतली. त्यातून शासकीय आकडेवारी आणि वास्तवातील मृत्यूची संख्या यात तिप्पट फरक आहेे.

पूर्वीपेक्षा तीनपट विस्तारपहिल्या लाटेत अंत्यसंस्कारासाठी दहा ते बारा गुंठा जमिनीचा वापर होत होता. दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीलाच फेब्रुवारी महिन्याच्या अखेर अंत्यसंस्कारासाठी पूर्वीच्या दुप्पट म्हणजे वीस ते बावीस गुंठे तर आता थेट ४० ते ४५ गुंठे जमिनीचा वापर होतो आहे.

आता नातलग अंत्यसंस्कारासह विधीसाठी येतात
कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्काराचा मोठा प्रश्न होता. नागरिकांच्या मनात असलेल्या भीतीमुळे कोणी अंत्यसंस्काराच्या ठिकाणी येत नव्हते. मात्र, आता अंत्यसंस्काराच्या ठिकाणी नातलग येऊ लागले आहे. शिवाय काही जणांचा विधिवत अंत्यसंस्कार करतात. काही जण अंत्यसंस्कारासाठी फक्त गोवऱ्या किंवा इतर साहित्याचा वापर करतात. शिवाय अस्थीही विसर्जनासाठी घेऊन जातात. त्यामुळे मृतदेहांची अवहेलना होत नाही.

सारवासारव अन‌् दोनचा आकडा
शेजारील जिल्ह्यात मृत झालेल्या परंतु दहनभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आलेल्यांची नोंदही होते आहे. त्यांच्यामुळेेच आकडा वाढला असल्याची माहिती प्रशासन सारवासारव करताना देते; परंतु गेल्या १६ दिवसांत शेजारील जिल्ह्यातील केवळ २ बाधितांचा या ठिकाणी अंत्यविधी झाला आहे. निदान आकडेवारीत तरी तसेच नमूद आहे.

माहिती खोटी, हेतू शुद्ध
कोरोनाचा धसका घेणाऱ्यांची संख्याही कमी नाही. मृत्यूचा वाढलेला आकडा कमकुवत हृदय असलेल्यांना धोकेदायक ठरू शकतो. प्रशासनाला प्रयत्न करूनही मृतांना वाचवता आले नाही. निदान मृत्यूची संख्या कमी दर्शवून कोरोनाची भीती सामान्यांमध्ये पसरू नये. बहुधा याच हेतूने ही आकडेवारी कमी दर्शविली असू शकते.

सारीने झाला ३५ बाधितांचा मृत्यू
हिरे रुग्णालयात कोरोना सोबतच सारीचे रुग्ण आढळून आले आहे. सुमारे दोन महिन्यात सारीमुळे सुमारे ३५ बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे ५० वर्षांपुढील मृतांपैकी सुमारे १५ जणांचा गेल्या दोन महिन्यात मधुमेहामुळे मृत्यू झाला आहे. या सुमारे १५ रुग्णांना कोरोनासदृशची लागण झाली होती.

विस्तव थंड होण्यापूर्वीच पुन्हा दुसरी चिता
दहनभूमीवरील दृश्य मन हेलावणारे अाहे. या ठिकाणी एक चिता थंड होण्यापूर्वीच दुसरी रचली जाते आहे. दहनभूमीवर पूर्व दिशेला लांबपर्यंत चिता रचल्या जात आहे. दिव्य मराठीने पाहणी केली त्यावेळी जागे अभावी एका चितेजवळ दुसरी चिता रचली जात होती. हे चित्र खूपच विदारक होते.

आता रात्रीही होताय अंत्यसंस्कार
दहनभूमीवर प्रशासनातर्फे आता रजिस्टर ठेवण्यात आले आहे. त्यात मृत्यू क्रमांक, दिनांक, मृताचे नाव, वारसदार सोबतच अंत्यविधीची वेळही नमूद केली जाते आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत सायंकाळपर्यंत अंत्यसंस्कार केले जात होते. आता मृतांची संख्या वाढल्यामुळे रात्री १० वाजेनंतरही अंत्यविधी होत असल्याची नोंद रजिस्टरमध्ये आहे. यावरून भयावह परिस्थितीचा अंदाज येतो. ठिकठिकाणी फक्त राख हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या खासगी जागेत कोरोनामृतांवर एक वर्षापासून अंत्यसंस्कार होत आहे. या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी वाहनातून आणलेला मृतदेह चितेवर ठेवताना नागरिक. दुसऱ्या छायाचित्रात दहनभूमीत धगधगत असणाऱ्या चिता. परिसरात सर्वत्र राखच राख साचली आहे.

ग्राउंड रिपोर्ट
कोरोनाचा कहर वाढत असताना आता मृतांच्या आकड्यांची लपवाछपवी सुरू झाली आहे. शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागे असलेल्या दहनभूमीत प्रत्यक्षात होणारे अंत्यसंस्कार व प्रशासनातर्फे कोरोनाबाधितांची जाहीर होणारी आकडेवारीत यात तफावत असल्याचे दिसून येते आहे.

बातम्या आणखी आहेत...