आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ च्या धुळे ते चाळीसगाव टप्प्याचे बोडरे गावापर्यंत चौपदरीकरण सुरू आहे. हे काम करताना सुरक्षा उपाय योजनांकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यावर तरवाडे ते धुळे शहर या टप्प्यात ७ दिवसात ३ अपघात झाले. त्यात दोन जणांचा जीव गेला. चौपदरीकरणाच्या कामामुळे धुळे-चाळीसगाव हे ५५ किलोमीटरचे सव्वा तासाचे अंतर कापण्यासाठी आता दोन ते सव्वा दोन तास जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
धुळे ते चाळीसगाव या टप्प्याचे काम सन २०२४ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत आहे. या पार्श्वभूमीवर हे काम वेगात सुरू आहे. अरुंद आणि खड्डेमय असलेला हा रस्ता आधीही त्रासदायक होता. चौपदरीकरण करताना इंडियन रोड काँग्रेसच्या सुरक्षाविषयक मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष झाले आहे. या विषयीचा अहवाल महामार्ग पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. रस्त्यावर अपघात वाढले आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याने आता शिरुड, विंचूर, दोंदवाड, बोरकुंड, मांडळ, जुनवणे, बोरविहीर, धामणगाव, बोधगाव, नाणे, सिताणे या गावातील नागरिक धुळे शहराकडे जाण्यासाठी आर्वी किंवा थेट मुकटीहुन येतात. ज्या ठिकाणी चौपदरीकरणाचे काम सुरू आहे त्या ठिकाणी सूचना व दिशादर्शक फलक नाही. ज्या ठिकाणी बॅरिकेट लावण्याची गरज आहे तेथे गोण्यांमध्ये वाळू भरून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अपघात वाढले आहे. त्यामुळे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
प्रवासी थांब्याची वाताहत चौपदरीकरणामुळे सर्व प्रवासी थांब्याची वाताहत झाली आहे. पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे थांब्यावर थांबणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होते. त्यातही शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. महामार्गाच्या शेजारी असणारे शेत शिवारातील रस्तेही खराब झाले आहे.
साईडपट्टी रस्त्यापेक्षा खाली चौपदरीकरण करतांना एका बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी खुला राहील यादृष्टीने काम होणार होते. पण गरताडबारीपासून पुढे रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोदकाम केले आहे. त्यामुळे साइडपट्टीच मुख्य रस्त्यापेक्षा खाली गेली. परिणामी अपघात होण्याचा धोका वाढला आहे .
गरताड, तरवाडेबारीत अपघात जास्त गरताडबारीत असलेला डोंगर पोखरुन रस्ता सरळ केला जातो आहे. या ठिकाणी अलीकडे एका लहान पुलाचे काम सुरू आहे. या पुलाच्या शेजारी कच्चा अरुंद रस्ता आहे. तशीच स्थिती तरवाडेबारीत आहे. तरवाडेबारीत सुरक्षेसाठी एकही उपाय उपाययोजना नाही. या दोन्ही ठिकाणी अपघात जास्त होत असल्याचे सात दिवसात दिसून आले आहे.
वळसा घालून जातांना होतेय कसरत शिरुड चौफुलीजवळ उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या ठिकाणी एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. बोरकुंडकडून शिरुडकडे जाणारे आणि येणाऱ्या नागरिकांना वळसा घालून पुढे जावे लागते. या ठिकाणी चाळीसगावकडून येणाऱ्या वाहन चालकांचा गोंधळ होतो. तशीच परिस्थिती जुनवणे गावात आहे. या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू असून पश्चिमेकडून वळसा घालून पुढे जावे लागते.
रिफलेक्टर लावण्याकडे दुर्लक्ष महामार्गावर रात्री काही ठिकाणी वाहन उभी असतात. ज्या ठिकाणी काम सुरू आहे तेथे रिफ्लेक्टर पुरेशा प्रमाणात लावण्यात आलेले नाही. त्यामुळे रस्त्याचे काम सुरू असल्याचे लक्षात येत नाही. जवळ आल्यावर काम सुरू असल्याचे कळते. त्यातून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.