आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कासवगती:आताच्या वेगाने लसीकरण सुरू राहिले तर अडीच वर्षे लागणार; 16 लाखांपैकी आतापर्यंत 1 लाख 73 हजार जणांना लस

धुळे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शहरात महापालिकेच्या दवाखान्यासह खासगी रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस दिली जाते आहे.

१ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे. २०१९च्या मतदार यादीनुसार १८ वर्षांवरील नागरिकांची संख्या १६ लाख ७९ हजार ९४२ एवढी आहे. जिल्ह्यात मागील तीन महिन्यांतील लसीकरणाचा वेग पाहता हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ८३६ दिवस म्हणजेच तब्बल अडीच वर्षांचा कालावधी लागणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४६ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र लसींच्या तुटवड्याने शंभर टक्के केंद्रांवर लसीकरण झालेले नाही. काेरोनावर मात करण्यासाठी जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. मागील तीन महिन्यांत एक लाख ७३ हजार४७९ नागरिकांचे लसीकरण झाले.

आतापर्यंत जिल्ह्याला एक लाख ८० हजार ६७० एवढ्या लसी प्राप्त झाल्या आहेत. त्यात एक लाख ३८ हजार ८२० कोविशील्ड तर ४२ हजार १५० डोस या कोव्हॅक्सीन आहेत. लसीकरणाची आतापर्यंतची गरज लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून यापूर्वीच आठ लाख डोसची मागणी नोंदवण्यात आलेली आहे. मात्र शासनाकडून अनियमित पुरवठा होत असल्यामुळे लसीकरण वारंवार ठप्प होत आहे. ज्या ठिकाणी दररोज १० हजारापेक्षा अधिक लसीकरण अपेक्षित आहे.

असे आहे लसीकरणाचे नियोजन
जिल्ह्यात आताच्या घडीला १४६ लसीकरण केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात ११ खासगी रुग्णालये तर १३३ शासकीय आरोग्य संस्था आहेत. त्यात ४१ प्राथमिक आरोग्य केंद्र, ८२ उपकेंद्र तसेच जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, महापालिकेच्या काही आरोग्य संस्था या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र अद्यापपर्यंत एकाच वेळेस शंभर टक्के केंद्रावर लसीकरण झालेले नाही.

अशी आहे जिल्ह्याची स्थिती

  • जिल्ह्याची लोकसंख्या २२ लाख
  • लसीकरणासाठी पात्र नागरिक- १६ लाख ७९ हजार ९४२
  • आतापर्यंत लसीकरण १ लाख ७३ हजार ४७९
  • पहिला डोस १ लाख ५० हजार ९५८
  • दुसरा डोस- २२ हजार ५२१
  • आता पर्यंत प्राप्त लस- १ लाख ८० हजार ६७०

मागणी लाखांत, पुरवठा हजारांत
आठ लाख डोसची मागणी केलेली आहे. मात्र असे असताना मिळणाऱ्या लस या हजारात आहेत. यामुळे ताळमेळ साधताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिवाय ग्रामीण भागात लसीकरण हे सोमवार, बुधवार आणि शुक्रवार अशा तीनच दिवस करण्यात येते. तर शहरी भागात मात्र दररोज लसीकरण सुरू आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना यंत्रणेच्या सोयीनुसार लसीकरण करून घ्यावे लागते.

अधिकाधिक लसींच्या डोससाठी प्रयत्नशील
जिल्ह्याला लस उपलब्ध होतात. त्यानुसार तातडीने लसीकरण केंद्रावर लस पुरवठा करण्यात येत आहे. आता १ तारखेपासून १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण सुरू करण्यात येणार असल्यामुळे अधिकाधिक लसी प्राप्त व्हाव्यात, त्यासाठी प्रयत्न आहेत. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्याधिकारी हे देखील प्रयत्नशील आहेत. -डॉ.शिवचंद्र सांगळे, जिल्हा लसीकरण अधिकारी,

लस नसल्याने महापालिका केंद्रात लसीकरण थांबले
शहरात महापालिकेच्या दवाखान्यासह खासगी रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस दिली जाते आहे. मात्र, सद्य:स्थितीत लस उपलब्ध होत नसल्याने महापालिकेच्या १२ केंद्रांसह पाच खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्र बंद झाले आहे. सद्य:स्थितीत केवळ सुभाषनगरातील दवाखान्यात लसीकरण करण्यात येत आहे. तेथे आता केवळ रविवारीच लसीकरण होईल एवढ्याच लसी शिल्लक आहे. महापालिकेंतर्गत कोविशील्ड लस देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शहरातील पाच खासगी दवाखान्यातून हीच लस दिली जाते आहे. मात्र, आता कोविशील्ड लस उपलब्ध नसल्याने या केंद्रावरील लसीकरण बंद झाले आहे. तसेच उर्वरीत ६ खासगी दवाखान्यात कोव्हॅक्सीन दिली जाते आहे.

बातम्या आणखी आहेत...