आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जिल्हास्तरीय पुरस्काराचे बक्षीस मात्र प्रलंबितच; स्मार्ट ग्राम पुरस्कारांचे 40 लाख प्राप्त

धुळे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील गाव, खेडी स्मार्ट होण्यासाठी आर. आर. पाटील सुंदर ग्राम योजना राबवण्यात येते. कोरोना महामारीमुळे या योजनेचा निधी दोन वर्षांपासून शासनदरबारी पडून होता. नुकताच तालुकास्तरावर स्मार्ट ग्राम ठरलेल्या गावांसाठी प्रत्येकी १० लाख या प्रमाणे ४० लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेच्या तिजोरीत जमा झाला. हा निधी चारही तालुक्यातील तालुकास्तरीय स्मार्ट गावांना वितरित करण्यात आला आहे. मात्र जिल्हास्तरावर निवड झालेल्या स्मार्ट गावासाठी दिला जाणारा ४० लाख रुपयांचा निधी शासनस्तरावर प्रलंबित आहे.

शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या आर.आर.पाटील स्मार्ट ग्राम योजनेतून प्रत्येक तालुक्यातून एक स्मार्ट गाव आणि यातून एक जिल्हास्तरीय गावाची निवड करण्यात येते. तालुक्यातील निवड झालेल्या स्मार्ट गावासाठी १० तर जिल्हास्तरावर निवड झालेल्या स्मार्ट गावासाठी ४० लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येतो. २०२०-२१ या वर्षातील एकूण ८० लाख रुपयांची पुरस्काराची रक्कम दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेला शासनाने पाठविण्यात आली नाही. आता यापैकी तालुकास्तरावर निवड झालेल्या जिल्ह्यातील चार गावांसाठीची एकूण ४० लाख रुपयांची रक्कम शासनस्तरावरून प्राप्त झाली आहे.

जिल्हा परिषदेकडून तालुक्यातील पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना ही रक्कम वळती करण्यात आली आहे. यात धुळे तालुक्यातील मांडळ, साक्री तालुक्यातील चिपलीपाडा, शिंदखेडा तालुक्यातील खलाणे आणि शिरपूर तालुक्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्रामचा १० लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. मात्र जिल्हास्तरावर निवड झालेल्या स्मार्ट ग्रामची ४० लाख रुपयांची रक्कम शासनाने अद्याप दिलेली नाही. जिल्हास्तरावर रोहिणी (ता. शिरपूर) ग्रामपंचायतीने स्मार्ट ग्रामचा मान मिळवला आहे. या ग्रामपंचायतीस बक्षीसाची प्रतीक्षा आहे. तर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘आर. आर. पाटील सुंदर ग्राम पुरस्कार योजना’ असे नामकरण केले.

बातम्या आणखी आहेत...