आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासरकारकडे वजन वापरून विकास कामांसाठी निधी आणला जातो. पण विविध विभागांचे अधिकारी एकमेकांकडे बाेट दाखवत काम वेगात करत नाही. हा प्रकार आता खूप झाला. कोणीही सहनशक्तीचा अंत पाहू नये. अक्कलपाडा याेजनेचे काम तीन महिन्यांत पूर्ण करावे. शहरातील भूमिगत गटारीच्या कामात चालढकल सहन करणार नाही, असा ताकीद खासदार डाॅ. सुभाष भामरे यांनी मनपा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महामार्ग विभाग, वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली.
जिल्हा विकास समन्वयक व नियंत्रण समितीची (दिशा) सोमवारी जिल्हा परिषद सभागृहात बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस, आयुक्त देविदास टेकाळे आदी उपस्थित होते. सभेत अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा झाला. या वेळी खासदार डाॅ. सुभाष भामरे यांनी मनपा आयुक्त, अभियंता व मजीप्राच्या अभियंत्यांना सभागृहात उभे करून त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.
दिवाळीपर्यंत या योजनेचे काम पूर्ण होणार होते ते झाले नाही. काम का पूर्ण होत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यावर मजीप्राचे अभियंता निकुंभे म्हणाले की, योजनेचे काम पूर्ण होण्यास दाेन ते तीन महिने लागतील. अभियंता कैलास शिंदे म्हणाले की, अभियंत्यांनी या कामाची नियमित पाहणी केल्याशिवाय काम पूर्ण होणार नाही. त्यासाठी मनपाचे सहकार्य असेल असेही ते म्हणाले. त्यावर खासदार डॉ. भामरे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी तीन महिन्यांत योजनेचे काम पूर्ण करावे, अशी सूचना केली.
आढावा देण्याची सूचना
शहरात अमृत याेजनेतून भूमिगत गटार याेजनेचे काम सुरू आहे. या कामावर आतापर्यंत १०५ काेटी खर्च झाले आहे. मात्र, मनपाने त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरलेली नाही. त्यामुळे काम रखडले असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. त्यावर खासदार डाॅ. भामरे यांनी नाराजी व्यक्त केली. सर्व विभागांनी समन्वयातून काम करावे, दर पंधरा दिवसांत योजनेचा आढावा घ्यावा, अशी सूचना खा. डाॅ. भामरे यांनी केली.
रुग्णकल्याण समितीच्या बैठकाच होत नाही
साक्री पंचायत समितीचे सभापती शांताराम कुवर यांनी रुग्णकल्याण समितीची बैठकच हाेत नसल्याची तक्रार केली. साक्री, पिंपळनेर पश्चिम पट्ट्यातील गराेदर मातांना उपचारासाठी धुळे येथे पाठवले जाते, असा आरोप केला. रुग्ण कल्याण समितीची नियमित बैठक घ्यावी, अशी सूचना करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.