आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेरणा:शिक्षित, प्रतिभावंत युवकांना देशातच रोजगार मिळावा : दयाशंकर तिवारी ; नवरत्नांचा होणार सन्मान

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात शिक्षण घेऊन विदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या भारतीय युवकांची संख्या मोठी आहे. अशा प्रतिभावंत तरुणांना भारतात रोजगार मिळणे गरजेचे आहे. त्यांच्या प्रतिभेचा देशाच्या विकासालाही लाभ होऊ शकतो, त्यासाठी संकटांकडे सकारात्मकदृष्ट्या पाहणे गरजेचे आहे, असे विचार नागपूरचे माजी महापौर व मोटिवेशन तज्ज्ञ दयाशंकर तिवारी यांनी केले. अग्रवाल समाजाच्या प्रांतीय अधिवेशनाच्या पहिल्या युवा सत्रात ते बोलत होते. दरम्यान, रविवारी नवरत्नांचा सन्मान केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलनाच्या रौप्यमहोत्सवी २५व्या प्रांतीय अधिवेशनाला शहरात सुरुवात झाली. सकाळी पहिल्या सत्रात अग्रसेन महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण व दीपप्रज्वलनाने अधिवेशनाचे अनौपचारिक उद‌्घाटन केले. अग्रवाल समाजाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार चौधरी, गोपाल अग्रवाल, सुनील सिंघानिया, विनोद अग्रवाल, अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष संजय अग्रवाल, किरण अग्रवाल, निकेश गुप्ता, अजय अग्रवाल आदी उपस्थित होते. विजयकुमार चौधरी यांनी अधिवेशनाची पार्श्वभूमी प्रास्ताविकांतून स्पष्ट केली. त्यानंतर झालेल्या युवा सत्रात दयाशंकर तिवारी आणि मनीष गुप्ता यांनी मार्गदर्शन केले. हिरे भवनात तरुणांबरोबरच पालक, महिलांची मोठी गर्दी होती. सूत्रसंचालन किरणकुमार अग्रवाल यांनी केले.

मनीष गुप्ता यांनी सांगितले की, आज प्रत्येकाला सुख हवे आहे. मात्र सुख केवळ पैशाने मिळत नाही. गरजूंना मदत केल्यानेही सुख मिळू शकते. समाजासाठी प्रत्येकाने वेळ देऊन त्या सुखाचा अनुभव घ्यावा. त्यासाठी ऊर्जेचे महत्त्व सांगतांना ऊर्जा प्राप्तीसाठी कोणत्या गोष्टी शिकणे गरजेचे आहे याचे मार्गदर्शन केले. ऊर्जा नसल्यास जीवनात नकारात्मता अधिक प्रमाणावर वाढत जाऊन अनुचित घटना घडतात. प्रत्येकाच्या जीवनात अनेक घटना घडतात. त्या घटना अपघात नसतात तर त्या संधी असतात. या संधीचे सोने करणे म्हणजे खऱ्या अर्थाने सुखप्राप्ती ठरते.

बातम्या आणखी आहेत...