आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र शासनाने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. त्यानुसार सलग तिसऱ्या वर्षी धुळे जिल्ह्याने उत्तम श्रेणी कायम राखली. मागील वर्षाच्या सर्वेक्षणात जिल्ह्याला ३८२ गुण प्राप्त झाले होते. आता ४०७.५ गुण मिळाले. जिल्हा राज्यात चौदाव्या क्रमांकावर आहे. कोरोना काळात शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी जिल्ह्यात अनेक उपक्रम राबवण्यात आले. त्याचीही नोंद सर्वेक्षणात घेण्यात आली.
केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाने सन २०१७-१८ पासून पीजीआय (परफॉरमन्स ग्रेडिंग इंडेक्स) अर्थात शैक्षणिक निर्देशांकानुसार राज्याचा शैक्षणिक निर्देशांक निश्चित करण्याचे पाऊल उचलले आहे. त्यानुसार केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय आणि साक्षरता विभागाने सन २०१९-२०२० व २०२०-२०२१ या वर्षाचा शैक्षणिक श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांक अहवाल प्रसिद्ध केला.
या अहवालात सन २०१९-२० मधील ७२५ तर २०२०-२१ मधील ७३३ जिल्ह्यांची गुणात्मक क्रमवारी प्रकाशित केली आहे. शालेय शिक्षणातील बदलांना चालना देण्याच्या उद्देशाने हा निर्देशांक काढला जातो. शैक्षणिक निर्देशांक भरताना ६ मुख्य निर्देशांकानूसार गुणांकन केले जाते. यू-डायस प्लस प्रणालीवर शाळांनी भरलेली माहिती, निर्देशाकांच्या आधारे ६०० गुणांसाठी राबवलेले उपक्रम, राष्ट्रीय सर्वेक्षण, भौतिक सुविधा, मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश वाटप, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सुविधा, विविध अभियानातील सहभाग याद्वारे निर्देशांक निघतो.
कशी मिळाली श्रेणी : श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांकांतर्गत रचना, परिणाम, वर्गांमधील व्यवहारांचा प्रभाव, पायाभूत सुविधा, सुरक्षा, बाल संरक्षण, डिजिटल शिक्षण आणि नियमन प्रक्रिया अशा ६ श्रेणींमध्ये एकूण ८३ निर्देशकांच्या आधारे ६०० गुण असतात. ९० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त जिल्ह्यांचा समावेश दक्ष श्रेणीत, ८१ ते ९० टक्के गुण प्राप्त करणारे जिल्हे उत्कर्ष श्रेणीत, ७१ ते ८० टक्के गुण प्राप्त जिल्हे उत्तम श्रेणीत, ६१ ते ७० टक्के गुण प्राप्त जिल्हे उत्तम श्रेणीत, ५१ ते ६० टक्के गुण प्राप्त जिल्हे प्रचेष्टा १ श्रेणीत, ४१ ते ५० टक्के गुण प्राप्त जिल्हे प्रचेष्टा २ श्रेणीत आणि ३१ ते ४० टक्के गुण प्राप्त करणारे जिल्हे प्रचेष्टा ३ श्रेणीत असतात.
गुणवत्ता सुधारण्यासाठी कशाचा झाला फायदा
कोरोना काळात ऑफलाइन शिक्षण बंद होते. या काळात जिल्ह्यातील शाळा आणि शिक्षकांनी शाळा बंद पण शिक्षण सुरू, ओट्यावरची शाळा, गृहभेटीतून शिक्षण, व्हाॅट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून शिक्षण दिले. धुळे पंचायत समितीने कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवले. अनेक शाळांनी यूट्यूब चॅनल सुरू केले. यासर्व बाबींमुळे जिल्ह्याची उत्तम श्रेणी कायम राहिली. येत्या वर्षात श्रेणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.