आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसोय:शहाद्याचा पाणीपुरवठा विस्कळीत २ दिवसांत पंप दुरुस्तीसाठी प्रयत्न; भर पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय

शहादा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सारंगखेडा येथून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा वीजपंप (मोटारी) नादुरुस्त झाल्याने गेल्या पाच दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, तो लवकरच सुरळीत करण्याचा प्रयत्न नगरपालिका प्रशासनातर्फे युद्धपातळीवर केला जात आहे.

गेल्या महिनाभरात अनेक वेळा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. आता पुन्हा विस्कळीत झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. सारंगखेडा येथून तापी नदीच्या पात्रातून कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. सारंगखेडा ते शहादा १६ कि.मी. अंतराची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. दोंडाईचा रस्त्यावर भेंडवा नाल्यानजीक मोठे जलशुद्धीकरण केंद्र उभारले असून, त्या केंद्रामार्फत शहरातील सर्व सहा जलकुंभ भरले जातात. मात्र विजेचे पंप नादुरुस्त झाल्याने पाण्याच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरल्या जात नसल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मुख्याधिकारी दिनेश सिनारे, प्रशासक प्रांताधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे यांच्या मार्गदर्शनात पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न करत आहेत.

सारंगखेडा पाणीपुरवठा योजनेच्या ठिकाणी मोठे तीन वीजपंप असून एक पंप तापी नदीच्या पात्रात बुडाला असून, अन्य दोन नादुरुस्त आहेत. पर्यायी व्यवस्था म्हणून स्टँडबाय वीजपंपाने पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याच्या टाक्या भरल्यानंतर पाणी सोडले जाते. पण मोठी अडचण निर्माण होत आहे. युद्धपातळीवर आमचा प्रयत्न सुरू आहे. मी स्वतः सारंगखेडा येथे वेळोवेळी जाऊन कायमस्वरूपी प्रश्न कसा मिटेल, यासाठी प्रयत्न करत आहे. मलाेनीजवळ असलेल्या जॅकवेल परिसरात बोअरवेलदेखील कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिकांनी नगरपालिकेला सहकार्य करावे. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अभिजित पाटील यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...