आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील दसवेल, टेंभलाय परिसरातील शंभरहून जास्त शेतकऱ्यांनी वीज कंपनीच्या येथील कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढला. या वेळी वीज कंपनीसह ऊर्जा मंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली. वीज कंपनीचे सहाय्यक अभियंता व्ही. जे. बोरसे यांना एक तास आंदोलकांनी घेराव घातला. शेतकऱ्यांना शनिवारपासून ठरलेल्या वेळेनुसार सलग आठ तास वीजपुरवठा करावा. तसे झाले नाही तर अधिकाऱ्यांना खुर्चीला बांधून ठेवू असा इशारा देण्यात आला. या विषयी वीज कंपनी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
तालुक्यातील दसवेल, टेंभलाय परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांसह तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहे. सद्य:स्थितीत शेतकऱ्यांना आठ तास वीज देण्याचे शासनाचे नियोजन आहे. त्यानुसार काही वेळा रात्री तर काही वेळा दिवसा आठ तास वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. काही वेळा भर उन्हात पाणी सोडावे लागते. पण काही दिवसांपासून केवळ चार तास वीजपुरवठा केला जातो आहे. भारनियमनाचे प्रमाण वाढले आहे. चार तास कमी दाबाने वीज मिळत असल्याने पिकांना पाणी देता येत नाही. विजेअभावी पिकांचे नुकसान होते आहे.
त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी वीज कंपनीच्या येथील कार्यालयावर मोर्चा काढला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. शेतकरी पायी चालत वरपाडे रोड लगत असलेल्या वीज कंपनीच्या कार्यालयात आले. या वेळी सहाय्यक अभियंता व्ही. जे. बोरसे यांना घेराव घातला. नियमित वीजपुरवठा का होत नाही याचा जाब अधिकाऱ्यांना विचारला. शेतकऱ्यांना शनिवारपासून सलग आठ तास वीजपुरवठा झाला नाही तर अधिकाऱ्यांना खुर्चीला बांधून ठेवू असा इशारा दिला. मोर्चात प्रकाश चौधरी, प्रवीण माळी, संजय माळी, राजेंद्र माळी आदी सहभागी झाले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.