आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Dhule
  • Eligible Beneficiaries From The List Of Households Include 'Kho', Those Who Have Permanent Housing; Discussion Took Place In DRDA Review Meeting In Zilla Parishad |marathi News

भोंगळ कारभार:घरकुलच्या यादीतून पात्र लाभार्थींना ‘खो’, पक्के घर अन् वाहन असणाऱ्यांचा समावेश; जिल्हा परिषदेत डीआरडीए आढावा बैठकीत झाली चर्चा

धुळे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तत्कालीन डाटा एंट्री ऑपरेटरवर कारवाई करण्याची मागणी

शासनाच्या आदेशानुसार ड यादीच्या सर्वेक्षणानुसार घरकुल योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना दिला जातो आहे. पण ड यादीचे सर्वेक्षण करताना खऱ्या लाभार्थ्यांना डावलण्यात आले. ज्यांच्याकडे पक्के घर आहे व दारात वाहन व घरात फ्रिज आहे त्यांची नावे घरकुल योजनेच्या यादीत टाकण्यात आली आहे. त्यामुळे याप्रकरणी तत्कालीन डाटा एंट्री ऑपरेटर, सर्वेक्षकांवर कारवाई करण्यात यावी तसेच वंचित लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ द्यावा, अशी सूचना जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संग्राम पाटील यांनी केली.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सभापती संग्राम पाटील यांनी ग्रामीण विकास यंत्रणेची आढावा घेतली. यावेळी प्रकल्प अधिकारी प्रतिभा संगमनेरे, गटविकास अधिकारी रावसाहेब वाघ, पंचायत समितीचे सदस्य रितेश परदेशी उपस्थित होते. सभापती संग्राम पाटील यांनी धुळे तालुक्यातील २०१६ ते २०२१ पर्यंत मंजूर केलेले घरकुल, अपूर्ण घरकुलांचा आढावा घेतला. बैठकीत डीआरडीएअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी ड यादी तयार करताना प्रामाणिकपणे काम झाले नाही. लोकप्रतिनिधींच्या मर्जीतील नागरिकांची नावे ड यादीत घेण्यात आली. खऱ्या लाभार्थ्यांना पद्धतशीरपणे डावलण्यात आले. अनेक गावांत किमान १०० ते १५० लाभार्थी घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित आहे. दुसरीकडे ड यादीत ज्यांची नावे आहे त्यापैकी काहींची पक्की घरे आहे. तसेच संबंधिताच्या अंगणात गाडी, घरात फ्रिज अशी सुबत्ता आहे. ड यादी तयार करताना हलगर्जीपणा झाला आहे. त्यामुळे तत्कालीन कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी सूचना सभापती पाटील यांनी केली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

पहिला हप्ता घेतला पण बांधकाम अद्यापही केलेच नाही
घरकुल योजनेच्या काही लाभार्थ्यांनी पहिला हप्ता घेतला पण बांधकाम केलेले नाही. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना नोटीस देण्यात आली आहे. तसेच संबंधितावर कारवाई प्रस्तावित करण्यात येते आहे. दहा टक्के लाभार्थी पहिला हप्ता घेऊन घराचे बांधकाम करत नाही. त्यांच्याकडून वसुलीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

बोगस लाभार्थ्यांना वगळणार
प्रकल्प अधिकारी प्रतिभा संगमनेरे म्हणाल्या की, घरकुल योजनेची ड यादी तयार करताना ज्या ठिकाणी ग्रामसेवकांनी लक्ष घातले, त्या ठिकाणी योग्य पद्धतीने यादी तयार झाली आहे. मात्र, ज्या ठिकाणी ग्रामसेवकांनी या कामातून अंग काढून घेतले, त्या गावाच्या यादीत बोगस नावे आली आहे. याविषयीच्या तक्रारी वाढल्या आहे. तक्रारीनुसार बोगस लाभार्थ्यांची नावे यादीतून कमी करण्यात येत आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...