आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशाेत्सवाची लगबग:शहाद्यात माेठ्या गणेशमूर्ती तयार करण्यावर भर; परराज्यातून मागणी

शहादा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन वर्षांत काेराेनाच्या काळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शहरातील गणपतीच्या मूर्ती तयार करणारे मूर्तिकार यंदा अहोरात्र मेहनत घेत आहेत. दोन दिवसांत उर्वरित मूर्ती तयार करण्यासाठी धडपड करत आहेत.शहाद्यात गणपतीच्या मूर्ती तयार करणारे १० ते १२ मूर्तिकार असून, त्यापैकी तीन ते चार मूर्तिकार मोठ्या मूर्ती बनवण्यासाठी प्रख्यात आहेत. यावर्षी काेराेनाबाबत कोणत्याही प्रकारचे नियम नसून, पूर्ण निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

त्यामुळे गणेश मूर्तिकारांनी जास्तीत जास्त मोठ्या मूर्ती बनवण्यावर भर दिला आहे. शहरातील तूप बाजार, शिवाजीनगर, मच्छी बाजार, भावसार गल्ली तसेच लोकमान्य टिळक टाऊन हॉल परिसर, भागात मूर्ती बनवण्याचे काम सुरू आहे. गणेशभक्त आतापासून मूर्ती पसंत करण्यासाठी तसेच खरेदीसाठी गर्दी करत आहेत. लोकमान्य टिळक टाउन हॉलजवळ लांबूनच मोठमोठ्या रंगीबेरंगी गणपतीच्या मूर्ती व भक्तांची गर्दी नजरेस पडते. गेल्या २५-३० वर्षांपासून मी गणपतीच्या मूर्ती तयार करतो. दरवर्षी मूर्ती तयार करण्याचे काम गणेशोत्सवाच्या सहा महिने आधी सुरू हाेते. अनेकांनी आधीच मूर्ती निश्चित केल्या आहेत. त्यामुळे यंदा अहोरात्र काम सुरू आहे. माझ्याकडे १० कारागीर आहेत. प्रत्येक कारागीर वेगवेगळ्या विभागाचे काम करतात, अशी माहिती येथील प्रख्यात मूर्तिकार याेगेश पाटील यांनी दिली.

लहान मूर्ती घरी, माेठ्या मूर्ती कारखान्यात निर्मिती
यंदा गणेशाेत्सवाचा आबालवृद्धांमध्ये सारखा उत्साह दिसत आहे. लहान ते माेठ्या अशा सर्वच गणेशमूर्तींना मागणी आहे. लहान मूर्ती घरी तयार करण्यात येतात तर मोठ्या मूर्ती मात्र कारखान्यात तयार कराव्या लागतात. यावर्षी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्ये उत्साह आहे. गणपतीच्या लहान मूर्तीही मोठ्या प्रमाणात तयार केल्या आहेत. गुजरात, मध्य प्रदेश राज्यातील गावांमध्येदेखील शहाद्यातूनच गणेशमूर्ती नेण्यात येतात. ५०० रुपयांपासून ४० ते ४५ हजार रुपयांपर्यंत किमतीच्या मूर्ती तयार आहेत, अशी माहिती प्रख्यात मूर्तिकार पाटील यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...