आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाभ:उज्ज्वल भविष्यासाठी दर्जेदार शिक्षणावर भर; दोन महिन्यांत आधुनिक ई-लायब्ररी

शिरपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • साठ आदिवासी विद्यार्थिनींना पटेल संस्थेतर्फे मोफत सायकल वाटप

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुणवत्तापूर्ण, दर्जेदार शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. शिरपूर तालुक्याला सर्वोत्तम शैक्षणिक दर्जा प्राप्त करून दिला आहे. येत्या दोन महिन्यांत जागतिक दर्जाच्या ई-लायब्ररीचे लोकार्पण करणार आहे. ही लायब्ररी शैक्षणिक प्रगतीसाठी फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन आमदार अमरीश पटेल यांनी केले.

येथील एच.आर. पटेल महिला महाविद्यालयातील ३० व आर. सी. पटेल सीनिअर कॉलेजच्या ३० आदिवासी विद्यार्थिनींना संस्थेतर्फे मोफत सायकल वाटप करण्यात आल्या. त्या वेळी ते बोलत होते. एस.एम. पटेल ऑडिटोरिअम हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. या वेळी कृतीबेन भूपेश पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक बबनलाल अग्रवाल, गोपाल भंडारी, आर. सी. पटेल सीनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी. आर. पाटील, एच. आर. पटेल महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा शितोळे उपस्थित होते.

आमदार अमरीश पटेल म्हणाले की, तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जात आहे. भूपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने ३२ हजार पेक्षा जास्त गोरगरिबांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली आहे. आदिवासी भागावर लक्ष केंद्रित केले आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आदिवासी व इतर सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, उत्तम करिअरसाठी प्राचार्य, प्राध्यापकांनी प्रयत्न करावे. गरीब व वंचित विद्यार्थ्यांना प्रेरित करून सहकार्य करावे, शिक्षण हे पुण्याचे काम असून, ते शिक्षकांनी मनापासून करावे.

तालुक्यात पुढील तीस वर्षे पाण्याची समस्या जाणवणार नाही असे काम केले आहे. शिरपूर ९० प्रोजेक्ट सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत ४५ आदिवासी विद्यार्थी व इतर ४५ विद्यार्थ्यांकडून जेईई, नीट परीक्षेची तयारी करून घेतली जात असल्याचे ते म्हणाले. प्राचार्य डॉ. डी. आर. पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न केले जात आहे. शिरपूरमध्ये ग्रामीण भागातून आदिवासी विद्यार्थी येतात. त्यांना सायकल देण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे. महाविद्यालयात कमवा व शिका योजनाही राबवली जात असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. गजानन पाटील, उपप्राचार्य डॉ. ए. एम. पाटील, उपप्राचार्य डॉ. रमेश जाधव, पौर्णिमा पाठक, प्रा. डॉ. विनय पवार, प्रा. हर्षदा पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. विद्या पाटील यांनी केले

बातम्या आणखी आहेत...