आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील विविध भागातील रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे. आग्रा रस्त्यासह अनेक भागात फेरीवाल्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी हाेते. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनंतर महापालिकेने मुख्य दहा रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला आहे. या रस्त्यावरील अतिक्रमणधारकांना पूर्वसूचना देण्यात आली आहे. पोलिस बंदोबस्त मिळाल्यावर लगेचच अतिक्रमण हटवले जाणार आहे. शहरातील आग्रा रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून थेट देवपुरातील जीटीपी स्टॉपपर्यंत अतिक्रमण आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी अतिक्रमण काढण्यासह पार्किंगचा प्रश्न सोडवण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त देविदास टेकाळे यांनी अतिक्रमण निर्मूलन पथकाला अतिक्रमण काढण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार अतिक्रमण काढण्याची तयारी सुरू झाली आहे.
आग्रारोडसह वडजाई, पारोळा, गल्ली क्रमांक सहा, देवपुरातील रस्ते घेणार मोकळा श्वास
कोणत्या भागातील अतिक्रमण निघेल
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते गुरुशिष्य स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते गांधी पुतळा चौक, राजकमल चित्रपटगृह ते मौलवीगंज, वडजाईरोड, पारोळारोड ते बाजार समिती, देवपुरात रवी बेलपाठक यांचे घर ते दत्त मंदिर चौक, गल्ली क्रमांक सहा, महापालिका इमारत ते साक्रीरोड, गरुड व्यापारी संकुल परिसरातील अतिक्रमण निघेल.
पोलिस बंदोबस्त मिळावा म्हणून पत्र
ज्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात येणार आहे त्या रस्त्यावरील अतिक्रमणधारकांना तोंडी सूचना देण्यात आली. त्यानुसार संबंधितांनी अतिक्रमण काढून घेणे अपेक्षित आहे. तसेच महापालिका प्रशासनाने अतिक्रमण काढण्यासाठी बंदोबस्त मिळावा, असे पत्र पोलिस प्रशासनाला दिले आहे. पोलिस बंदोबस्त मिळताच अतिक्रमण काढण्यात येईल, अशी माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.