आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबारावीचे वर्ष आयुष्याला कलाटणी देणारे असते. त्यामुळे पहिल्या दिवसापासून पालक मुलांकडे लक्ष देतात. त्यांना कोणत्याही संकटाला तोंड द्यावे लागू नये याची काळजी घेतात. दुसरीकडे काहींना कौटुंबिक परिस्थितीमुळे संकटाला तोंड द्यावे लागते. त्यानंतरही संघर्ष करत काही विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश मिळवले. त्यांच्या जिद्दीचीही कहाणी.
अंबू...हॉटेलात ११ तास पोळ्या लाटून अभ्यास
अंबू भावसिंग पावरा. शिरपूर तालुक्यातील हिवरखेडा येथील मूळ रहिवासी. चोपडा-अमळनेर रस्त्यावरील हॉटेल मानसीमध्ये ११ तास पोळ्या लाटण्याचे काम करायचा. आई-वडील मोलमजुरी करतात. हलाखीची परिस्थिती असल्याने अंबू हॉटेलमध्ये काम करून शिक्षण घेत आहे. हलाखीची स्थिती बदलायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, म्हणून तो प्रचंड परिश्रम घेत आहे. हॉटेलमध्ये तो सकाळी ९ ते रात्री ११ पर्यंत पोळ्या लाटण्याचे काम करतो. दुपारी १२ ते ३ दरम्यान व रात्री अभ्यास करून त्याने बारावी विज्ञान शाखेचा अभ्यास केला. सतखेडा (ता.धरणगाव) येथील सीताराम बाबूराव पाटील आश्रमशाळेत ६८.५० टक्के गुण मिळवून तो उत्तीर्ण झाला. वैद्यकीय क्षेत्रात त्याला करिअर करायचे आहे. हॉटेल मालक गजानन पाटील यांनी त्याचे पेढा भरवून कौतुक केले.
स्वामी... अंधत्वापुढे मानली नाही हार
शहरातील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षण घेणारा स्वामी सोनवणेने प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत बारावीच्या परीक्षेत ६७.३० टक्के गुण मिळवत यश मिळवले. स्वामीच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर त्याने जिद्दीने अभ्यास केला. स्वामी अंध असून त्याला दिवाळीनंतर अभ्यासक्रम मिळाला. एका सामाजिक संस्थेकडून अभ्यासाचे रेकॉर्डिंग प्राप्त झाले. त्याचे श्रवण करून स्वामीने परीक्षेत यश मिळवले. पुस्तके घेण्याची परिस्थिती नसल्याने त्याने केवळ मराठीचे एकच पुस्तक विकत घेतले होते. त्याने कॉपी राइटरच्या मदतीने पेपर दिले. तो आता आता पुढील शिक्षणासाठी मुंबईला जाणार आहे. तसेच संगणकाचा कोर्स करणार आहे. भविष्यात स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वामीचे स्वप्न आहे.
कुणाल... पितृछत्र हरपले तरीही सोडली नाही चिकाटी, जिद्द
जन्मताच अंधत्व पदरी आलेला धुळे तालुक्यातील फागणे येथील कुणाल श्याम पाटीलचे सहा वर्षांपूर्वी त्याचे पितृछत्र हरपले. आई मोलमजुरी करते. कुणालने न खचता परिस्थितीला तोंड देत दहावीच्या परीक्षेत ७९ टक्के पटकावले होते. त्यानंतर शिवाजी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयातून त्याने बारावीची परीक्षा दिली. अडचणींना तोंड देत तो बारावीच्या परीक्षेला सामोरा गेला. परीक्षेत लेखनिकाची मदत घेत ६४.८३ टक्के गुण मिळवले. आता विद्यावर्धिनी महाविद्यालयात तो प्रवेश घेणार आहे. त्यानंतर बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याचे कुणालचे स्वप्न आहे. शंभर टक्के अंध असताना मिळेल ते काम करून कुणाल शिक्षण घेतो आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.