आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनपा अग्निशमन दलातर्फे शहरातील खासगी इमारती, शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटलचे दरवर्षी फायर ऑडिट केले जाते. ज्यांचे ऑडिट झाले त्यांना एनओसी दिली जाते. त्यासाठी १५ ते २० हजार रूपये शुल्क आकारणे आवश्यक असताना अग्निशमन अधिकारी तुषार ढाके यांनी खासगी हॉस्पिटलला सरसकट ५०० रुपयात एनओसी दिली. त्यामुळे तुषार ढाके यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी महापालिका स्थायी समितीच्या सभेत झाली. चर्चेनंतर सभापती शीतल नवले यांनी ढाके यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले.
मनपा सभागृहात गुरुवारी ही सभा झाली. सभापती शीतल नवले अध्यक्षस्थानी होते. अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, नगर सचिव मनोज वाघ आदी उपस्थित होते. नगरसेवक नागसेन बोरसे म्हणाले की, खासगी हॉस्पिटलचे फायर ऑडीट करतांना अग्निशमन अधिकारी तुषार ढाके यांनी सरसकट ५०० रुपये घेत एनओसी दिले. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले.
ढाके यांनी एनओसीसाठी फक्त ५०० रुपये कसे काय घेतले याची चौकशी करावी. तसेच तुषार ढाके वैद्यकीय कारणामुळे रजेवर होते. ते आता पुन्हा हजर झाले. त्यांनी फिटनेस प्रमाणपत्र दिलेले नाही. त्यामुळे त्यांना नोटीस द्यावी, अशी सूचना सभापती शीतल नवले यांनी केली. मनपा हद्दवाढीच्या क्षेत्रातील भूखंडाची परस्पर विक्री झाली असून या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला असा प्रश्न त्यांनी विचारला. उपायुक्त विजय सनेर म्हणाले की, या प्रकरणी महिनाभरात अहवाल सादर होईल. याविषयावर सोमवारी बैठक होणार आहे.
अधिकारी उशीरा आल्याने नाराजी
सभा सुरु झाल्यावर काही अधिकारी उशीरा आले. काही न सांगता गैरहजर होते. त्यामुळे सभापती नवले यांनी नाराजी व्यक्त केली. सभापती सभागृहात आल्यानंतर हळुच अधिकारी येतात, हा प्रकार चुकीचा आहे. जे अधिकारी उशीरा आले व बैठकीला गैरहजर होते त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश झाले.
दुकानांची परस्पर विक्री : मनपा व्यापारी संकुलातील दुकानांची परस्पर ६२ लाखांना विक्री होत असून या प्रकरणी चौकशी करावी अशी मागणी झाली. त्यावर सभापती नवले यांनी मनपा व्यापारी संकुलातील दुकान कोणाच्या ताब्यात आहे, मुळ मालक कोण आहे याचा अहवाल १५ दिवसात द्यावा, अशी सूचना केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.