आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअवैध सावकारी करणाऱ्या राजेंद्र बंब याच्याकडे अनेक मुद्द्यांची चौकशी करायची आहे. विमा कंपनीकडून भरण्यात येणाऱ्या सरेंडर फॉर्म बद्दलही विचारणा करायची असल्यामुळे राजंेद्र बंबची पोलिस कोठडी वाढवण्याची मागणी पोलिसांनी सोमवारी न्यायालयात केली. त्यानंतर दुपारी योगेश्वर पतसंस्थेतील बंब याचे लॉकर उघडण्याची कार्यवाही सुरू झाली. या ठिकाणी बंबचे सात लॉकर आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या लॉकरमधील घबाड मोजण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
खासगी सावकारीतून अनेकांची पिळवणूक करणाऱ्या राजेंद्र बंबच्या विरोधात रविवारी दुसरा व मध्यरात्री पुन्हा दोन गुन्हे दाखल झाले. सोमवारी त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे राजेंंद्र बंबला न्यायालयात नेले. सरकार पक्षातर्फे अॅड. पराग मधुकर पाटील यांनी बाजू मांडली. संशयित राजेंद्र बंब याच्याकडे अजूनही चौकशी बाकी आहे. कर्ज देताना दबावातून काढला जाणारा विमा अन् त्याच्या सरेंडर फॉर्मबद्दल विचारणा बाकी आहे. संशयित राजेंद्र बंब याचा भाऊ संजय पसार आहे.
तसेच त्याच्याकडे ५८ परकीय नोटांचे चलन असून, ते कोणी व कसे दिले. यासह इतर प्रश्नांच्या खोलात जाण्यासाठी पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर राजेंद्र बंब याच्या पोलिस कोठडीत ११ जूनपर्यंत वाढ करण्यात आली. न्यायालयातील कामकाज झाल्यावर दुपारी बंब यास घेऊन पथक पुन्हा रवाना झाले.
त्यानंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास पोलिसांनी देवपुरातील योगेश्वर पतसंस्थेतील राजेंद्र बंब याचे लॉकर उघडले. या ठिकाणी सात लॉकर त्याच्या नावावर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या लॉकरमध्ये मोठे घबाड मिळाले आहे. त्याची मोजणी व हिशेब करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पंचनामा व इतर शासकीय नोंदीनंतर हे घबाड उद्या मंगळवारी वरिष्ठांसमोर ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आता पुढे काय : जयेश दुसानेनंतर प्रमोद जैन, विलास ताकटे, गणेश गवळी यांनी ही तक्रार दिली आहे. त्यामुळे राजेंद्र बंबचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढणार आहे. त्यातही गणेश गवळीची तक्रार शहर पोलिसांत दाखल असल्यामुळे शहर पोलिसही चौकशीसाठी त्याला अटक करू शकतात किंवा हा गुन्हा आर्थिक शाखेकडे वर्ग होऊ शकतो.
दुकानावर होता बंबचा डोळा
गल्ली क्रमांक ५ मध्ये राहणारे विलास दामोदर ताकटे (वय ४६ ) यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, दीपलक्ष्मी या खताच्या दुकानासाठी बंबकडून कर्ज घेतले होते. त्याची व्याजासह परतफेड केली. मात्र, त्यानंतरही बंबने अधिक व्याजाची मागणी केली. शिवाय तोपर्यंत खरेदी खत देणार नाही, अशी भूमिका घेत पिळवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दिव्यांग बंधूचीही केली पिळवणूक
सम्राट नगरातील रहिवासी गणेश बाबूराव गवळी ( वय ३०) या तरुणाने तक्रार दिली आहे. त्याचे मोठे बंधू अशोक व लक्ष्मण गवळी दिव्यांग आहे. दूध व्यवसायात म्हशी घेण्यासाठी जानेवारी २०२१मध्ये बंबकडून १३ लाखांचे कर्ज घेतले. त्या मोबदल्यात सांजोरी गावातील जमिनीची कागदपत्रे घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.