आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक वनदिन:लळिंग कुरणासह कावठी, लामकानी, पुरमेपाड्यात वन आच्छादनामुळे जमिनीची धूप थांबली, जलस्रोत बारमाही

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाने जंगल वाढत असल्याचे केले नमूद, वन्यजीवांनाही फायदा

ग्लोबल वॉर्मिंगची समस्या डोकेदुखी ठरत असताना शहरापासून जवळ असलेल्या लळिंग, कावठी, लामकानी आणि पुरमेपाडा वनक्षेत्र हिरवळीने नटले आहे. वृक्षांचे प्रमाण वाढल्याने जमिनीची धूप कमी झाली. परिसरातील तापमान सुमारे ८ अंशाने कमी होऊन जलस्रोत बारमाही झाले. त्यामुळे वन्यजीव व जंगलाला लागून असलेल्या गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत झाली. वन विभागाच्या प्रयत्नांचे हे फलित आहे.

जिल्ह्यात १ लाख ९२ हजार हेक्टरमध्ये वनक्षेत्र विस्तारले आहे. शहराला लागून असलेल्या लळिंग, कावठी, लामकानी, पुरमेपाडा या चार वनक्षेत्रांमध्ये वनाच्छादन बहरले आहे. त्यामुळे दाट जंगल वाढण्यासह पर्यावरणीय सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. या भागात काही वर्षांपूर्वी केलेल्या वृक्षारोपणांमुळे वन्यजीवांनाच नव्हे तर परिसरातील गावांनाही फायदा होतो आहे. वनाच्छादनामुळे जगलांमध्ये पावसामुळे होणारी जमिनीची धूप कमी झाली.पाण्याच्या प्रवाहात सरसकट धरणापर्यंत वाहून जाणारी माती आत वाहून जात नाही. तसेच झाडांच्या मुळावाटे भूजल पातळी वाढण्यास मदत झाली. त्याचा पहिला फायदा वनक्षेत्रातील जलस्रोतांना झाला. त्यामुळे या भागातील जलस्रोतांमध्ये बारमाही पाणी असते.तसेच भूजल पातळी वाढल्यामुळे या वनक्षेत्रांना लागून असलेल्या गावांमधील भूजलपातळी वाढली. वनाच्छादनामुळे या वनक्षेत्रातील तापमान अन्य भागातील तापमानापेक्षा नेहमी सुमारे ८ अंशांनी कमी असते. उन्हाचा तडाखा वनहद्दीत जाणवत नाही. कधीकाळी वृक्षहीन झालेले हे वनक्षेत्र केवळ बहरलेच नव्हे तर दाट जंगलात रूपांतरित झाले आहे. वन्यजीवांची संख्या वाढते आहे. चारही वनक्षेत्रात बिबट्या, लांडगा, कोल्हा, चिंकारा प्रजातीचे हरण, ससा, रानमांजर, घोरपड, तरससह अन्य वन्यजीवांचा वावर आहे.

बारमाही पानवठा, १३ हजार पक्षी नोंद
वनाच्छादन वाढल्यामुळे पाणवठेही बारमाही झाले आहे. त्यामुळे यंदा १२ ते १४ फेबुवारी दरम्यान झालेल्या पक्षी प्रगणनेत विविध जातीचे सुमारे १३ हजार ६८९ पक्षी आढळले. वनाच्छादन वाढल्यामुळे पक्ष्यांची संख्या वाढल्याचे वनाधिकारी सांगतात.

श्रेय जाते ग्रामस्थ, वनविभागाला
वनविभागाने या चार वनक्षेत्रात रोपवन केले. त्यासाठी वनविभाग व ग्रामस्थांचा समावेश असलेल्या संयुक्त वन आस्थापना समितीने प्रयत्न केले. त्यातून सकारात्मक चित्र दिसते आहे. शिवाय पाणवठे बारामाही होऊन भूजल पातळी वाढली आहे. -संजय पाटील,सहायक वनसंरक्षक, धुळे.

काय म्हणते सर्वेक्षण
शासनाने एफएसआय अर्थात फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया केला होता. या सर्वेक्षणात जिल्ह्यात वनाच्छादन वाढत असल्याचे नमूद करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्याचा अहवाल वरिष्ठांनाही पाठवण्यात आला होता.

असे आहे वनक्षेत्र
{लळिंग : २०० हेक्टर {पुरमेपाडा : १५० हेक्टर {कावठी : १२५ हेक्टर {लामकानी : २५० हेक्टर

बातम्या आणखी आहेत...