आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:महावितरणच्या नावाने ग्राहकांची फसवणूक; वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून आलेल्या मेसेजला ग्राहकांनी प्रतिसाद देऊ नये

धुळे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीज ग्राहकांना बनावट एसएमएस पाठवून वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क साधायला सांगणे, त्यानंतर लिंक पाठवून किंवा सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगण्यात येते. त्यातून ग्राहकांची आर्थिक फसवणूक केली जाते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या बनावट ‘एसएमएस’ला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे.

काही दिवसांपासून वीज ग्राहकांना बनावट एसएमएस पाठवून लुबाडण्याचे प्रकार घडता आहे. मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे ताबडतोब सोबत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे बनावट एसएमएस नागरिकांना पाठवण्यात येत आहेत. मात्र, वीज कंपनीकडून कोणत्याही वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून अशा प्रकारचे एसएमएस व व्हॉट्सअॅप मेसेज पाठवण्यात येत नाही. फक्त मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीज ग्राहकांना सिस्टिमद्वारे एसएमएस पाठवण्यात येतात. त्याचा सेंडर आयडी हा एमएसईडीसीएल असा आहे. तसेच या अधिकृत मेसेजमधून वीज ग्राहकांना किंवा नागरिकांना महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क करण्याबाबत कळवले जात नाही.

मात्र, सध्या सायबर गुन्हेगार वीजबिलाची रक्कम भरलेली नसल्याने वीजपुरवठा आज रात्री खंडित करण्यात येत आहे, असा संदेश वेगवेगळ्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून पाठवतात. या मेसेजनंतर वीजबिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून ऑनलाइन पेमेंटसाठी बनावट लिंक पाठवण्यात येत आहे. तसेच ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. ग्राहकांनी त्यास प्रतिसाद दिल्यास मोबाइल किंवा संगणक हॅक करून बँक खात्यातील शिल्लक रक्कम लंपास केली जाते. त्यामुळे वीजग्राहकांनी बनावट मेसेज व लिंककडे दुर्लक्ष करावे.

त्याचबरोबर वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून नागरिकांना पाठवण्यात येणारे मेसेज बनावट आहे. त्यास प्रतिसाद देऊ नये. बिलाच्या पेमेंटसाठी लिंक किंवा कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करू नये. तसेच मेसेजमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क साधू नये. काही शंका व तक्रारी असल्यास ग्राहकांनी वीज कंपनीच्या १९१२, १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांक किंवा नजीकच्या कार्यालयांशी संपर्क साधावा, असेही आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

वीज कंपनीच्या मेसेजमध्ये काय असते
महावितरणकडून मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीज ग्राहकांनाच ‘एसएमएस’द्वारे पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीजबिलांची रक्कम, स्वत:हून मीटर रीडिंग पाठवण्याचे आवाहन, मीटर रीडिंग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीजबिलाची रक्कम, देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची रीतसर नोटीस आदी माहिती पाठवण्यात येते.

बातम्या आणखी आहेत...