आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएसटी महामंडळातर्फे आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी करियर सेवा (मालवाहतूक) सुरू करण्यात आली आहे. या सेवेचे महाकार्गो असे नामकरण केले आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ही सेवा पाच महिन्यांपासून बंद होती. गेल्या महिन्यापासून सुरू झालेल्या महाकार्गो सेवेच्या दरात वाढ करण्यात आली आहे. संप काळात महाकार्गो सेवा बंद असल्याने धुळे आगाराला तब्बल पंधरा लाखांचा फटका बसला. एसटी महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी मालवाहतूक सेवा सुरू केली आहे. तिला व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत होता.
मात्र, विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांकडून ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन पुकारण्यात आले. त्याचा फटका या सेवेलाही बसला. ही सेवाही या आंदोलनाच्या काळात पाच महिने बंद होती. त्यानंतर गेल्या महिन्यापासून एसटी पूर्ववत सुरू झाली आहे. त्यानुसार धुळे आगाराकडूनही ६ एप्रिलपासून महाकार्गो सेवा सुरू करण्यात आली. मात्र, गेल्या महिन्यात फारसा प्रतिसाद नव्हता. मे महिन्यात प्रतिसाद वाढत होता. मात्र, इंधन दरवाढ झाल्याने डिझेलच्या किमतीही वाढ झाली. परिणामी महामंडळाने महाकार्गेच्या दरात वाढ केली. धुळे आगाराकडून महाकार्गो सेवेसाठी एसटी बसेचे ट्रकमध्ये रूपांतर करण्यात आले होते. एकूण नऊ ट्रकद्वारे ही सेवा दिली जाते.
सुरुवातीला शंभर किलोसाठी प्रती किलोमीटर ४८ रुपये असलेला दर आता ५५ रुपये करण्यात आले आहे. भाडे चार हजाराऐवजी साडेचार हजार केले आहे. याशिवाय २०० किलोपेक्षा अधिक वजनासाठी ५७ रुपये प्रति किलोमीटरच्या दरही वाढले आहे. त्यामुळे या सेवेवर काही प्रमाणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ही दरवाढ १ मे पासून लागू करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोंबर २०२१ मध्ये या सेवेद्वारे ४ हजार ३१५ किलोमीटरचा प्रवासातून महामंडळाला २ लाख ६० हजार ६०० रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले होते. एप्रिल २०२२ मध्ये केवळ एका गाडीचा वापर करण्यात आला. त्याद्वारे २ हजार २५५ किलोमीटरचा प्रवासातून ९९ हजार ६४० रुपयांचे उत्पन्न महामंडळाला मिळाले आहे. नियमित सेवेतून साधारणपणे पाच ते सहा हजार किलोमीटरच्या प्रवासातून महाकार्गोतून महामंडळाला दरमहा तीन ते चार लाखांपर्यंतचे उत्पन्न प्राप्त होत होते. मात्र, संपामुळे उत्पन्नावर परिणाम झाला असून, संपाच्या पाच महिन्यांच्या काळात सेवाही बंद असल्याने पंधरा लाखांचा फटका महामंडळाला बसला आहे. मात्र, आता मालवाहतूक पूर्ववत सुरू झाल्याने महामंडळाला उत्पन्न सुरू झाल्याची माहिती आगारप्रमुख अनुजा दुसाने यांनी दिली.
खासगी पंपावरून डिझेल खरेदी
एसटी महामंडळाने स्वत: आगारात डिझेल पंप सुरू केले होते. मात्र, इंधन कंपनीकडून एसटी महामंडळाला जादा दराने डिझेल पुरवठा होत होता. लिटरमागे पंधरा ते वीस रुपयांचा फरक होता. त्यामुळे महामंडळाने डिझेलचे टँकर मागवण्याऐवजी खासगी पंपावरून डिझेल भरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काही पंपांचीही निवड करण्यात आली. त्यानुसार धुळे आगाराने एकूण सहा पंपांची निवड केली आहे. त्यात धुळे-नाशिक महामार्गावर दोन, गरताड, फागणे, साक्रीरोड आदी ठिकाणाच्या पंपाचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.